जेएसएम महाविद्यालयातील जून्या आठवणींना उजाळा

स्नेहसंमेलनातून एकटवले माजी विद्यार्थी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयातील 2001 मधील टीवाय बीएच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन रविवारी (दि.19) कुरुळ येथे उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या स्नेहसंमेलनातून 23 वर्षांनी माजी विद्यार्थी एकटवल्याचे चित्र पहावयास मिळाले.

जेएसएम महाविद्यालयात टीवायबीए पदवी शिक्षण पुर्ण झाल्यावर काही विद्यार्थी संसारात रमले, काही विद्यार्थी पुढील शिक्षणात तर काही विद्यार्थी नोकरी व्यवसायात गुंतले. त्यामुळे अनेकांचा संपर्क तुटला होता. मोजकेच मित्रमंडळींची भेट होत असतं. टीवायबीए वर्गातील सर्व विद्यार्थी एकत्र आले पाहिजे ही संकल्पना रसिक काळे यांनी मनात आणली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वजण हळुहळू एकत्र आले. त्यांचा एक ग्रुप तयार झाला. त्यानंतर स्नेहसंमेलनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षापासून सर्व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत.

यंदादेखील स्नेहसंमेलन कुरुळ येथे आयोजित करण्यात आला. सकाळी सर्व माजी विद्यार्थी जमले. एकमेकांची विचारपूस यावेळी करत प्रत्येकजण काय करीत आहेत, याची माहिती दिली. प्रत्येकाने आपआपले मत व्यक्त केले. त्यानंतर वेगवेगळे खेळ खेळण्यात आले. एक वेगळा उत्साह या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी तुषार थळे, मनोज गावंड, जुबेर सय्यद, रसिक काळे यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version