आरडीसीसी बँकेच्या लोणेरे शाखेचे नव्या जागेत स्थलांतर

अलिबाग | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील लोणेरे याठिकाणी असणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थलांतरित जागेचा शुभारंभ बुधवारी लोणेरे येथे गोरेगाव चिंचवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन दामू बटावले यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत लोणेरेचे सरपंच रवींद्र टेंबे, माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय पंदेरे, माणगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे पाटील, केंद्र कार्यालयाचे सिनियर मॅनेजर नरेश कोळी, लोणेरे शाखेचे शाखाधिकारी अश्रफ ढोकळे आणि बँकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

\रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यामध्ये एकूण 58 शाखा असून, त्यापैकी लोणेरे शाखेचे मूळ उद्घाटन नोव्हेंबर 2008 मध्ये करण्यात आले होते. या शाखेचा पूर्वीचा पत्ता मुंबई-गोवा हायवे रोडवर, श्रीधर घोसाळकर यांच्या मालकीच्या जागेत होता. आता स्थलांतर केल्यामुळे बँकेच्या लोणेरे शाखेचा नवीन पत्ता लोणेरे-गोरेगाव रोडवरील देविदास राठोड यांच्या मालकीच्या जागेतील लोणेरे बाजारच्या वरील पहिला मजला असा असणार आहे.

लोणेरे शाखेने मागील 12 वर्षांमध्ये अतिशय चांगला व्यवसाय केलेला असून, आज अखेर बँकेमध्ये 5 कोटी 33 लाखांच्या ठेवी असून, रक्कम रु.2.61 कोटी इतके कर्ज बँकेने वितरीत केले आहे. तसेच आजवर बँकेच्या वतीने बचतगट, शेतकरी यांनादेखील अभिनव योजनांद्वारे कर्ज वितरण करण्यात आले आहे. नवीन जागेमध्येदेखील बँकेच्या वतीने ग्राहकांना अधिक तत्पर आणि जलद सेवा देण्यास बँक कटिबद्ध असेल, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

Exit mobile version