राज्यातून चौथ्या क्रमांकाला गवसणी
| रसायनी | प्रतिनिधी |
पुण्यातील देवाची उरुळी येथील द इन्फिनिटी स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य आईस स्टॉक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आईस स्टॉक स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ पुण्याचे अध्यक्ष श्रीकांत सोमसे, सचिव अक्षता वीरकर व टेक्निकल डायरेक्टर सुनील कदम यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रशांत सातव व प्रवीण सातव यांच्या हस्ते पार पडले. ही स्पर्धा शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संदेश, प्रवीणसिंह कोळी, यश सरनाईक व गायत्री यांनी पंच म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहिले. या स्पर्धेत स्पर्धेत पनवेल-रायगड, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणांहून सुमारे अडीचशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
आईस स्टॉक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 11 खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यापैकी 9 खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आणि चौथ्या क्रमांकाचे चषक पटकावले. त्यामुळे ही बाब रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. रायगड जिल्ह्याच्या संघाचे नेतृत्व जिल्हा प्रतिनिधी म्हणून भूपेंद्र गायकवाड व संस्कृती घरत यांनी केले. तर, टीम को-ऑर्डिनेटर म्हणून बिपीन जाधव यांनी संघ व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
यावेळी संस्कृती घरत यांनी खेळाडूंना मानसिक बळ, शिस्त व स्पर्धात्मक आत्मविश्वास देत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच, भूपेंद्र गायकवाड यांनी आपल्या अनुभवसंपन्न नेतृत्वातून, काटेकोर नियोजनातून व खेळाडूंवरील वैयक्तिक लक्षातून संघाला प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच रायगड जिल्ह्याच्या संघाने राज्यपातळीवर आपली ठसठशीत छाप पाडली. दरम्यान, रायगड जिल्ह्याचे विजयी खेळाडू प्रमोद ठोंबरे, यश मोरे, संस्कृती घरत, धनेशा शिंगोटे, हुजेफा लकडावाला, तन्वी शेलार, निसर्गा गवळी, साक्षी ननावरे आदींसह मार्गदर्शक, समन्वयक व पालकवर्गाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच, रायगड जिल्हा भविष्यात आईस स्टॉक स्पोर्ट्समध्ये आणखी मोठी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







