प्रस्तावित धरणग्रस्तांकडून बॅनर बाजी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर होणाऱ्या शिलार धरणाला स्थानिक 23 गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शासनाला बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी निवेदने दिली आहेत. शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मात्र, तरी देखील शेतकऱ्यांना धरण होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे शिलार धरण शेतकरी संघर्ष समितीने गावोगावी फलक लावून शेत जमिनीमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला पाऊल ठेवू देऊ नका असे आवाहन केले आहे.
चिल्लार नदीवर कीकवी येथे बांध घालून पाणी अडवले जाणार असून, या धरणामुळे या भागातील 23 गावे आणि वाड्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे. आजही शेतीवर अवलंबून असलेल्या या भागातील जमिनीला या भागातील शेतकरी आपली आई मानतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मे 2025 मध्ये धरण बांधण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर या भागात सरकार विरोधी वातावरण तयार झाले आहे. धरण बांधण्याची घोषणा करणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार देखील धरणाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत. त्यानंतर प्रस्तावित धरणामुळे बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत स्तरावर 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत पाच ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी धरण नको म्हणून ठराव घेतले.
त्यानंतर शेतकऱ्यांनी शिलार धरण हटाव संघर्ष समितीचे माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन कर्जत तहसील कार्यालयावर 18 मार्च रोजी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला. हा मोर्चा काढल्यानंतर देखील धरण परिसरात येऊन शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये माती परीक्षण करण्याचे काम तसेच ड्रिल मारण्याची कामे केली जात आहेत. गावोगावी असे फलक लागले असून, पाटबंधारे खाते किंवा ठेकेदार कंपनी यांचे अधिकारी या भागात पोहोचल्यास कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
शेतकरी संतप्त
शेतकरी संतप्त झाला असून संघर्ष समितीचे वतीने सर्वत्र फलक लावून ड्रिल मारण्याची कार्यवाही करायला कोणीही अधिकारी आला तर त्याला पिटाळून लावण्याचा इशारा दिला आहे.







