पुनाडे धरणात 70 टक्के पाणी साठा
। उरण । वार्ताहर ।
उरणला पाणीपुरवठा करणार्या दोन धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने रानसई धरण भरुन वाहू लागले आहे. तर पुनाडे धरणात 70 टक्के पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे उरणकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून जल चिंता दूर झाली आहे.एकंदरीत रानसई धरण तुडूंब भरुन वाहू लागल्याने पर्यटकांची पावले हळूहळू रानसई धरण परिसरातील निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटण्यासाठी वळली आहेत.
रानसई धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता 1000 कोटी म्हणजे 10 एम.सी.एम. इतकी असून या धरणातून उरणमधील औद्याोगिक कारखान्यासह येथील 20 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीना व उरण नगर परिषदेला पाणीपुरवठा होतो. तर पुनाडे धरणाची पाण्याची क्षमता 1.75 एम.सी.एम एवढी असून उरण पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोण, पाले, गोठवणे, आवरे, कडापे या गावांतील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या दोन्ही धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने रानसई धरण तुडूंब भरुन वाहू लागले आहे. तर पुनाडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे.त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला असून जल चिंता दूर झाली आहे. पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्गरम्य रानसई धरण तुडूंब भरुन वाहू लागल्याने पर्यटकांची पावले हळूहळू ही रानसई धरणाच्या दिशेने वळली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.