रेशन दुकानदारांना हवे मानधन; फेब्रुवारीमध्ये तीन दिवस दुकान बंद

22 मार्चला दिल्लीत संसदेवर मोर्चा

| कोर्लई | वार्ताहर |

जानेवारी 2023 पासून शिधापत्रिकाधारकांना वर्षभर मोफत धान्य देण्याच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे दुकानदारांच्या समस्यांमध्ये भर पडली असून, दुकानाचे भाडे, लाईट बिल, इंटरनेट सेवा व कामगारांचे वेतन कसे करावे, याचे मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. शासनाने दुकानदारांना मोफत धान्य वाटपात महिन्याचे आगाऊ मानधन देण्यात यावे, अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केली आहे. दरम्यान, रेशन दुकानदारांना भेडसाविणार्‍या अन्य विविध समस्यांबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी देशभरातील सर्व रेशन धान्य दुकाने बंद ठेवण्यात येणार असून, 22 मार्चला दिल्लीत संसदेवर मोर्चा काढणार असल्याचेही घोसाळकर यांनी सांगितले.

मागील मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी काळात शासनाकडून मोफत धान्य वाटपातील जवळपास आठ महिन्यांचे मार्जिन या दुकानदारांना देण्यात आले नसल्याचे व संबंधित बिले जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडून असल्याची चर्चा ऐकिवात आहे. यातील खरे सत्य समोर आले पाहिजे. त्यातच यंदा शासनाच्या जानेवारी महिन्यापासून वर्षभर मोफत धान्य निर्णयाने दुकानदारांच्या समस्यात भर पडली असून, दुकानाचे भाडे, लाईट बिल, इंटरनेट सेवा व कामगारांचे वेतन कसे करावे, याचे मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

त्यातच रास्त भाव धान्य दुकानदारांना मिळणारे धान्य महिन्याच्या सात तारखेला मिळणे आवश्यक असताना वीस, बावीस तारीख उलटूनही मिळत नाही. निकृष्ट धान्य पुरवठा केला जात असल्याने संबंधित दुकानदारांना वेळप्रसंगी ग्राहकांच्या वादाला तोंड द्यावे लागते. शासनाच्या संबंधित पुरवठा विभागाने रास्त भाव धान्य दुकानदारांच्या समस्यांच निराकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. शासनाने रास्त भाव धान्य दुकानदारांना मोफत धान्य वाटपात महिन्याचे आगाऊ मानधन देण्यात यावे, अशीही मागणी जोर धरीत असल्याचे समजते.

केंद्र सरकानं रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याचं जाहीर केलं आहे. परंतु धान्याचं वितरण करणार्‍या दुकानदारांच्या कमिशनबाबत कोणतीच स्पष्टता केलेली नाही. याबाबत केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी देशभरातील सर्व रेशन धान्य दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. या बंदमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व दुकानदार सहभागी होणार आहे. तर, केंद्र सरकारचं या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी 22 मार्चला दिल्लीच्या संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी दिली.

ई-पॉस मशीनमध्ये वेळेवर धान्य न आल्यामुळे व दुकानांमध्ये धान्य असल्यामुळे दुकानदार धान्य का देत नाही, अशा संभ्रमात ग्राहक असतो, मग ग्राहक व दुकानदारांना वादाला तोंड द्यावे लागते. सर्व्हर डाऊन, वारंवार लाईट जाणे, व्हायफाय बंद असणे, या सर्व गोष्टींमुळे दुकानदार पॉस मशीनला कंटाळले असून, पूर्वीप्रमाणे सुविधा पुरवावी.

प्रमोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष, रेशन धान्य दुकानदार संघटना
Exit mobile version