। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील जुने पूल कमकुवत झाले आहेत. त्या पूलांच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी या पुलांच्या दुरुस्तीपेक्षा नुतनीकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहेत. लाखो पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देतात. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. मात्र जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल-इंदापूरचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने पर्यटनावर त्याचा परिणाम होण्याची भीती वक्त केली जात आहे. अलिबाग-मुरुड-रोहा या तीन तालूक्यांना जोडणारा साळाव पूल कमकुवत झाला आहे. या पूलाच्या दुरुस्तीसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. रत्नागिरी-रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पूलाच्या दुरुस्तीसाठी देखील खर्च केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात या पूलांच्या नुतनीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
सरकारने आगरदांडा ते दिघी पुलाची घोषणा करण्यात आली आहे त्यासाठी करोडो रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पनवेल-इंदापूर चौपदरी करणाबरोबार पूलांच्या नुतनीकरणाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.







