पिंगळसई प्राथमिक शाळेचा बदलला चेहरामोहरा

Oplus_16908288

अमृतवेल सोशल फाऊंडेशनच्या सहभागातून डागडुजी, रंगकाम

| धाटाव | प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या पिंगळसई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्थेत असलेल्या या शाळेची नुकतीच अमृतवेल सोशल फाऊंडेशनच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली असून,आकर्षक रंगकामामुळे ही शाळा आता खासगी शाळांच्या तोडीस तोड दिसू लागली आहे.

शाळेच्या इमारतीचे छतातून पाणी गळण्याची किरकोळ कामे, भिंतींवरील जुना प्लास्टर काढून नवीन सिमेंटचे अस्तर लावून तडे बुजवण्यात आले आणि खिडक्यांची तावदाने फुटणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन अमृतवेल सोशल फाऊंडेशन यांनी एकत्र येत शाळेच्या नूतनीकरणाचा विडा उचलला.शाळेच्या बाह्य भिंतींना प्रसन्न देणारा पिवळा आणि पांढरा रंग देण्यात आला आहे, तर आतील भिंतींवर अभ्यासाशी संबंधित चित्रे रेखाटण्यात आली आहेत. भिंतीवर सुविचार, सूचना फलक आणि फळ्यांचे रंगकाम असे सर्व काम करून घेण्यात आले. या बोलक्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

फाऊंडेशनचे अध्यक्ष सौरभ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सचिन मोरे, सूरज तुळवे यांसह सहकारी वर्गाने श्रमदान आणि आर्थिक मदत केली. शाळेचे रूप पालटल्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला आहे.तर शाळेला दिलेल्या रंगाचे ध्येय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंग यावे आणि त्यांनीही भविष्यात सुजाण नागरिक होऊन देशाचे चांगले भविष्य घडवावे असे मत सचिन मोरे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version