12 फलाटांसह स्वतंत्र वाहतूक नियंत्रक कक्ष
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले माणगाव बस स्थानक हे वाहतुकीच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. 1982 मध्ये उभारले गेले असून बस स्थानकाचे क्षेत्रफळ 9,450 चौरस मीटर आहे. तर, 2011 मध्ये माणगाव बसआगार झाले. त्याचे क्षेत्रफळ 19,278 चौरस मीटर आहे. हे स्थानक गेल्या चार दशकांहून अधिक काळ हजारो प्रवाशांची वर्दळ सामावून घेत आहे. त्याचे क्षेत्रफळ आज या स्थानकाला नवसंजीवनी मिळत असून ते अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रवाशाभिमुख रूपात पुन्हा आकार घेत आहे.
माणगाव बस स्थानक व बसआगार या दोघांचाही समन्वय साधत सध्या सुरू असलेले नूतनीकरणाचे काम माणगाव शहराच्या वाहतूक व्यवस्थेला आणि प्रवासी सुविधांना नव्याने गती देणारे ठरत आहे. पूर्वी येथे 8 फलाटं होती. मात्र, गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सवांच्या काळात प्रवासी संख्येत वाढ होणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ते अपुरे पडत होते. त्यामुळे नवीन 4 फलाट वाढवण्याचे काम वेगात सुरू आहे. हे फलाट अधिक प्रशस्त व सुरक्षित असून यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाचे ठरणार आहेत. या नूतनीकरणात केवळ फलाटच नव्हे तर बस चालक, वाहक व कर्मचाऱ्यांच्या विश्रांती गृहांचे नुतनीकरण, प्रसाधनगृहांची सुधारणा, तसेच गरम पाण्यासाठी गिझरची व्यवस्थाही केली जात आहे.
माणगाव बसस्थानकात प्रवाशांसाठी स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता हे तीन प्रमुख निकष केंद्रस्थानी ठेवून बस स्थानकाच्या प्लास्टरिंग, रंगरंगोटी व संपूर्ण विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, स्वतंत्र नवीन वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असून त्यामुळे बस आगमन, प्रस्थान व आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन अधिक चोख होणार आहे. प्रवाशांना वेळेवर आणि अचूक माहिती मिळण्यासाठी हे पाऊल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आजपासून अवघ्या 45 दिवसांवर आलेला गणेशोत्सव लक्षात घेता, हे काम तातडीने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा कटाक्ष आहे. कोकणातील या पर्वकाळात लाखो भाविकांचा प्रवास माणगाव मार्गे होतो. त्यामुळे स्वच्छ, सुसज्ज व सुरक्षित बस स्थानक ही काळाची गरज बनली आहे. या सर्व बदलांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बस स्थानक हे केवळ एक प्रवासी केंद्र राहणार नाही, तर प्रवाशांच्या मनात आश्वासकतेचा आणि सुविधांचा किरण बनून उभे राहणार आहे.






