अंबा नदीच्या पुलाची डागडुजी

दिपक पवार यांची सामाजिक बांधिलकी

| पाली | वार्ताहर |

खुरावले फाटा ते वाघोशी मार्गावर भेरव येथील अंबा नदीवरील पुलावर पडलेले महाकाय खड्डे अखेर भरण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते व वाघोशी ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच दिपक पवार यांच्या प्रयत्नांतून व वसुधा सोसायटीच्या सहकार्यातून हे महाकाय खड्डे भरण्यात आले आहेत.

अंबा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूस रस्त्याला मोठं मोठे पडले होते. वाहनचालकांना वाहने चालविताना अडचणी येत होत्या. तसेच पुलावरदेखील खड्डे असल्याने रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत होती. तसेच पुलावरील खड्ड्यांतून लोखंडी सळ्या निघाल्या असल्याने वाहनांच्या टायरमध्ये घुसून टायर फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. या सर्व अडचणी लक्षात घेत दिपक पवार यांनी याबाबत वसुधा सोसायटीच्या व्यवस्थापनासोबत चर्चा करुन ते खड्डे भरण्याची मागणी केली. या मागणीला वसुधा सोसायटीकडून हिरवा कंदील दाखवित खड्डे भरण्यासाठी लागणारे मटेरियल व खड्डे भरण्यासाठी कर्मचारी देण्याची तयारी दर्शविली.

या रस्त्याचे काम काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावर कालांतराने लगेच खड्डे पडण्यास सुरुवात झाली. रस्त्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी शिल्लक असूनदेखील ठेकेदार याकडे ढुंकूनही बघत नाही. ऐन पावसाळ्यात नागरिकांना या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मात्र, तरीदेखील ठेकेदार व प्रशासनाचे संबंधित अधिकारी या खड्डेमय परिस्थितीकडे बघायला तयार नाहीत, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, स्थानिक व खासगी व्यस्थापनाच्या सहकार्यातून रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत. अंबा नदीवरील खड्डे भरल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत दिपक पवार व वसुधा सोसायटीच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन केले जात आहे. खड्डे भरतेवेळी दिपक पवार, वसुधा सोसायटीचे व्यवस्थापक शरद चोरघे, अभियंता संकेत, प्रकाश मोकल, जगन्नाथ देशमुख आदी उपस्थित होते.

Exit mobile version