मुसळधार पावसात सुरू होती मोहीम
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील कोथळी गडावरील बुरुज ढासळला होता. त्या बुरुजाची दुरुस्ती करण्यासाठी भर पावसात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानकडून मोहीम आखण्यात आली आणि ती मोहीम शेकडो हातांनी यशस्वी देखील केली. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या 100 दुर्गसेवकांनी तो बुरुज पुन्हा सुस्थितीत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.
यावेळी जय शिवराय म्हणत कोथळीगडाच्या ढासळलेल्या बुरुजाची सह्याद्री प्रतिष्ठाण हिंदुस्थान कडून मोहीम फत्ते करण्यात आली. एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना या दुर्गसेवकांनी हाती घेतलेली मोहीम चोख बजावत पुन्हा एकदा गड किल्यांचे वैभव बाधीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कर्जत विभागातील या दुर्गसेवकांनी हाती घेतलेल्या मोहिमेत शेकडो दुर्गसेवक यानिमित्ताने एकत्र आले होते.
कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला 19 किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला 22 किलोमीटरवर असलेल्या पेठ अंबिवली पुढे एका सुळक्यावर हा किल्ला आहे. कोथळीगड किल्ला छोटा असून पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. सध्या पुरातत्त्वीय विभागाकडून होत असलेले दुर्लक्षामुळे किल्ल्याची दुरवस्था होत चाललेली. परंतु, येथील दुर्गसेवकांमूळे आजही येथील गड किल्यांचे महत्व बाधित राहिलेले दिसत असल्याचे म्हणायला हरकत नाही.
कर्जत तालुक्यात मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे कोथळीगड (पेठचा किल्ला) येथील बुरुजाचा काही भाग ढासळला होता. त्यामुळे येथील महत्व लक्षात घेता सह्याद्री प्रतिष्ठाण च्या दुर्गसेवकांनी तात्काळ दुर्गसंवर्धन मोहीम आयोजित करून रविवारी (दि.14) सह्याद्री प्रतिष्ठाण हिंदुस्थान कर्जत विभागाने मोहीम आखली आणि याला कर्जतच्या दुर्गसेवकांबरोबरच पेण, पनवेल, मुंबई, अंबरनाथच्या दुर्गसेवकांची उपस्थिती लाभली. शेकडोने उपस्थित झालेल्या दुर्गसेवकांनी ही मोहीम फत्ते केली आहे.
मोहिमेच्या सुरवातीला गडपूजन करून बुरुजाचा ढासळलेला माती आणि दगडचा भाग व्यवस्थित पुन्हा वापरता येल अशा पद्धतीने रचून ठेवण्यात आला जेणेकरून पुन्हा पावसामुळे कुठले नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली असल्याचे सांगण्यात आलं. दरम्यान, यावेळी गडावर प्रतिष्ठाणच्या माध्यमातून बसवलेले दरवाजे-तोफगाडे यांची शाकारणी करून अतिरिक्त वाढलेले गवत काढून टाकण्यात आले,तर पावसाळा संपताच डागडुजी करण्याचा निर्धार सुद्धा यावेळेस सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाकडून घेण्यात आला.
या मोहिमेचे नेतृत्व कर्जत विभागातील दुर्गसेवक सुरज खडे, भुषण बेलोसे, निरंजन ठाणगे, रितेश वायकर, हरेश मते, मिथिलेश म्हामुणकर, विनायक मराडे, प्रणव जंगम, रोहन म्हामुणकर, मयुर मते, अक्षय मते, सचिन धुळे, गणेश जाधव, अतुल घरत, समिर मराडे यांनी केले. आजवर या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक गड किल्यांचे संवर्धन राखण्यात आले असून सर्व मोहीम फत्ते करण्यात आलेल्या आहेत.
