| पनवेल | वार्ताहर |
राजकीय अनास्थेच्या साठमारीत अडकलेला साडेतीन किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. ते अद्याप सुटताना दिसत नाही. ड्रेनेजचे पाईप फुटल्याने पावसाळ्यात अपघाताच्या धोक्यासोबत दुचाकीस्वारांवर जलाभिषेक होतो. अनेक संकटांचा सामना करत उड्डाणपूल निमूटपणे अत्याचार सहन करित आहे.
अर्धवट राखडलेल्या कामामुळे त्याची लया गेली आहे. डांबरीकरण उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. झेब्रा क्रॉस आणि रंगीत पट्टे, दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकांना चकवा बसतो. शिवाय गेल्या दोन तीन वर्षांपासून उड्डाणपुलाची ड्रेनेज वाहिनी फुटल्याने अनेकदा बाका प्रसंग उद्भवला होता. पावसाळ्यात वरून धबधब्यासारखे अचानक पाण्याचे लोट कोसळून दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. वाहनांच्या काचावरही पावसाचा अचानक मारा झाल्याने दचकून चालकांकडून अपघात होत होते. त्यामुळे या घटना अतिशय चिंतेच्या होत्या. पनवेल संघर्ष समितीने मान्सून पूर्व कामांचा सातत्याने पाठपुरावा करून अधिकार्यांकडून ही सर्व कामे मार्गी लावून घेतली आहेत.







