| रोहा | प्रतिनिधी |
जुलै महिन्यात आलेल्या पुरात कुंडलिका नदीच्या पुलावरील संरक्षण कठड्यांची दयनीय अवस्था झाली होती. पुराच्या पाण्यात काही संरक्षण कठडे आरसीसी फाउंडेशन सहित वाहून गेले होते. एकंदरीत पुलावर संरक्षण कठडे नसल्यामुळे नागरिकांत विशेषतः विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार संबधित ठेकेदाराने या संरक्षण कठड्यांची तातडीने दुरुस्ती केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर, दुसरीकडे अपघाताचा धोका देखील टळला आहे.
जुलै महिन्यात रोहे शहर व ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने पार झोडपून काढले होते होते. तुफान पर्जन्यवृष्टीमुळे येथील कुंडलिका नदीला पूर आल्याने पुराच्या पाण्यात वेगवान प्रवाहात वाहून आलेल्या भल्या मोठे ओंढक्यांमुळे पुलावरील संरक्षण कठडे मुळासकट उखडून उद्ध्वस्त झाले होते. त्याचप्रमाणे पुलाची देखील पार दुर्दशा झाली होती. संरक्षण कठडे तुटल्याने या पुलावरून नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालक जीव मुठीत धरून ये-जा करित असत. तर, पुलाची पुन्हा एखादा दुरुस्ती व्हावी, अशी मागणी जनतेतून होत होती. या मागणीची रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेण्यात आली. सणासुदीच्या दिवसात बाहेर गावातून रहिवाशी गावात येत असतात. त्यामुळे या पुलावर त्यांची गैरसोय होऊ नये अथवा कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये म्हणून पावसाने उसंती घेताच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबधित ठेकेदाराने पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी पुलावरील संरक्षण कठडे पुन्हा एकदा मजबूतपणे उभे केल्याने संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे. पुलावर संरक्षण कठडे उभे राहिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
उद्ध्वस्त झालेल्या पुलाची दुरुस्ती
