पाताळगंगा परिसरातील कालव्यांची दुरुस्ती करा: आ. जयंत पाटील


| मुंबई | प्रतिनिधी |
पाताळगंगा परिसरातील माजगाव, आंदिवली, वारद, पोंध आणि अन्य आदिवासी वाड्यांमध्ये शेतीला बारमाही पाणी मिळावे यासाठी कालवे तयार करण्यात आले आहेत. या कालव्यांमध्ये पाताळगंगा नदीचे पाणी सोडले जात असूनही गेल्या पाच वर्षांपासून हे कालवे कोरडे पडले आहेत, असा तारांकित प्रश्‍न शेकाप आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात जयंत पाटील यांनी दिलेली वस्तुस्थिती खरी असल्याचे म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खरसुंडी गावाजवळ पाताळगंगा नदीवर सन 1976 साली बांधण्यात आलेला खरसुंडी वळण बंधारा या योजनेच्या लाभक्षेत्रात सदर गावे ही खोपोली ते पाताळगंगा या औद्योगिक क्षेत्रात येतात. कालवे नादुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून शेतकर्‍यांकडून सिंचनासाठी पाणी मागणी नसल्यामुळे कालव्यात पाणी सोडण्यात येत नाही. तसेच या परिसरातील शेतकर्‍यांकडून मागील 5/6 वर्षापासून सिंचनासाठी पाणी मागणी प्राप्त झालेली नाही. पावसाळ्यात येणार्‍या पूरपरिस्थितीमुळे सदर कालव्याचा भराव बर्‍याच ठिकाणी नादुरस्त असून, कालव्यावरील बांधकामे नादुरुस्त झालेली आहेत, तसेच शेतकर्‍यांची सिंचनासाठी पाणी मागणी नसल्याने कालव्यातून पाणी सोडण्यात येत नाही.

कालव्याच्या माती भरावाची दुरुस्तीची कामे सन 2022-23 मधील यांत्रिकी विभागामार्फत करण्यात येणार्‍या पाखरण कार्यक्रमामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले असून, सदर कामे जून-2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच खरसुंडी वळण बंधारा मजबुतीकरण व त्याच्या कालव्यावरील बांधकामाची दुरुस्तीची कामे सन 2023/24 या आर्थिक वर्षामध्ये निधी उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

Exit mobile version