आंबेत खाडीवरील बंधार्‍याची दुरुस्ती करा; आ.जयंत पाटील यांची मागणी

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आंबेत (ता. म्हसळा, जि.रायगड) खाडीवरील बंधार्‍याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

आंबेत खाडीवरील बंधार्‍याला भगदाड पडल्याने लिपणी वावे, खारगाव, आमशेत, लिपणी वावे मोहल्ला, बौध्दवाडी येथील सुमारे 300 एकर भातशेतीत खारे पाणी शिरल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले असल्याचे जयंत पाटील यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. गत काही दिवसांपूर्वी आंबेत ते लिपणी वावे (ता.म्हसळा, जि.रायगड) या 12 कि.मी.च्या पट्ट्यात लहान मोठे बंधारे बांधले असून या बंधार्‍याचे पिचिंग ढासळल्याने ग्रामस्थांनी खारभूमी तसेच लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पत्रव्यवहार करून सदर बाब निदर्शनास आणून दिली होती. ते लिपणी वावे (ता.म्हसळा) या 12 कि.मी. पट्ट्यातील नादुरुस्त बधार्‍यांमुळे भातशेतीनंतर लावलेल्या पावटा, हरभरा, मुग, तुर आदी पिकांचेही नुकसान झाल्या बाबत ही आ. पाटील यांनी विचारणा केली.

उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करुन बंधार्‍यांचे पीचींग दुरुस्तीचे काम करण्याबाबत तसेच खारे पाणी शेतात शिरल्यामुळे भातशेती तसेच इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना मिळावी यादृष्टीने कोणती कार्यवाही केली याचाही जाब त्यांनी विचारला.

त्यावर उत्तर देताना खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मान्य करीत स्पष्ट केले की, आंबेत ते लिपणी, वावे, खारगाव, लिपणीवावे मोहल्ला, बौध्दवाडी, आमशेत या भागात आवेत (बाणकोट) खाडीवर बानुमरियम, आमशेत व सदेरी या खारभूमी योजना आहेत. या तीन योजनांपैकी आमशेत या खारभूमी योजनेची तातडीच्या दुरुस्तीची कामे विस्तार व सुधारणा लेखाशिर्षातर्गत हाती घेऊन योजनेचे क्षेत्र बाधित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ही योजना सुस्थितीत आहे.

बानुमरीयम या खारभूमी योजनेस अतिवृष्टीमुळे जुलै, 2021 ला आलेल्या पुरात खांड गेली होती. सद्य:स्थितीत सदर खांडीचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून क्षेत्र नापीक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच या योजनेची संपूर्ण नुतनीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होताच काम हाती घेण्याचे नियोजन आहे. सदर काम पूर्ण झाल्यानंतर योजनेचे 36 हेक्टर क्षेत्र संरक्षित होणार आहे. संदेरी खारभूमी योजनेचे काम संबधीत ठेकेदाराने पूर्ण न केल्यामुळे दंडात्मक कार्यवाही करुन तसेच निविदा अंतिम करून उर्वरित काम सुधारित अंदाजपत्रकानुसार हाती घेण्याचे नियोजन केले आहे असेही खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले.

ग्रुप ग्रामपंचायत लिंपणीवावे, ता.म्हसळा यांनी मरियमखार येथील खारभूमी बंधार्‍याची नादुरुस्ती व उघाडी दूरुस्तीची बाब खारभूमी विभागाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. मरियमखार हा भाग बानुमरीयम खारभूमी योजनेच्या पुनःप्रापीत क्षेत्रात येत असून सद्य:स्थितीत या योजनेच्या खांडीचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून क्षेत्र नापीक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच उघाडीच्या दुरुस्तीचे काम उपलब्ध निधीतून हाती घेण्यात येत आहे. या योजनेच्या संपूर्ण नुतनीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होताच काम हाती घेण्याचे नियोजन असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले

Exit mobile version