अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग समुद्रकिनारीलगतच्या वस्त्यांना नादुरूस्त झालेल्या बंधार्यामुळे उधाणाच्या पाण्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी बंदर विभागाशी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली व लवकरात लवकर बंधारा व पकटी दुरूस्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात दिलेल्या पत्रात प्रशांत नाईक यांनी म्हटले आहे की, अलिबाग शहर हे रायगड जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून, अलिबाग शहरास सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे. समुद्र किनार्यालगतच्या बंधार्यावरील पकटी बहुतांश नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे तुटलेल्या बंधार्यातून पाणी आत शिरुन किनार्याजवळील कोळीवाडा तसेच इतर परिसरात जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शास्त्रीनगर येथे नवीन पकटीचे बांधकाम करणे तसेच कोळीवाडा-जलसापाडा येथील पकटीचे दुरुस्तीचेकाम विभागामार्फत लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाने तात्काळ उपायोजना करण्याबाबत आदेश देण्याची मागणीही प्रशांत नाईक यांनी केली आहे.