कशेळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत -मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील कशेळे गाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्ता धुळीचा बनला होता, त्याबद्दल स्थानिक व्यावसायिक दुकानदार यांनी एकदा रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी श्रमदान केले होते. शेवटी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर आणि उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान अखेर राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी रस्त्यावर असलेले खड्डे आणि रस्त्याची दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.

राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्याची कामे केली जात नसल्याने स्थानिक व्यावसायिक यांनी श्रमदान करून रस्ता दुरुस्त केला होता. मात्र, तरी देखील महामंडळाला जाग येत नव्हती आणि त्यामुळे स्थानिकांनी शेवटी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन मुख्य अभियंता यांची भेट घेतली होती. तेथे मुख्य अभियंता यांनी आठ दिवसात येथील कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले होते, मात्र महिना लोटला तरी महामंडळाकडून कोणतेही काम सुरू केले जात नव्हते.

शेवटी कशेळे ग्रामस्थांनी 16 फेब्रुवारी पासून रस्ता रोको आणि उपोषण आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर महामंडळाला जाग आली आणि गेली तीन दिवस रस्त्यावर किरकोळ कामे सुरू केली, परंतु रस्त्यावर काँक्रीटीकरण करण्याची कोणतीही तयारी दिसत नसल्याने स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त करीत महामंडळा चे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. शेवटी सोमवारी (दि.23) पासून कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील कशेळे गाव येथील प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version