‘वीजचोरी कळवा आणि बक्षीस मिळवा’

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शेजारच्या घरातून वीज घेतली असता किंवा घरातील वीज व्यावसायिक स्वरुपात वापरल्यास भारतीय विद्युत कायदा 2003 अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात येते. कायद्यात आर्थिक दंड ठोठावण्याची तसेच तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा याची तरतूद आहे. परंतु, अशा कारवाईत वीज वितरणचे कर्मचारी उखळ पांढरे करून घेत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या नऊ महिन्यांत 51 वीजचोरी प्रकरणात कारवाई केली असल्याचे समजते. या कारवाईत वीज वितरणातील ‘जनसेवकाने’ प्रत्येक प्रकरणात आर्थिक तडजोड केल्याची जोरदार चर्चा सध्या सुधागड तालुक्यात आहे. ही तडजोड कितीची झाली व हा कर्मचारी कोण? याची चौकशी होणार का? हाच खरा प्रश्‍न आहे. तसेच लाखो रुपयांची तडजोड होत असेल, तर या ‘भस्म्या’ झालेल्या ‘जनसेवकाची’ कमाई किती? असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.‘वीजचोरी कळवा आणि बक्षीस मिळवा’ सारखा स्त्युत उपक्रम वीज वितरणाने जाहीर केला आहे. परंतु, वसुली जनसेवक स्वतःचाच ‘उपक्रम’ राबवून दलालांची फौज उभी करून, दलालांमार्फत तक्रारी घेऊन आर्थिक तडजोड करणार नाहीत याची खात्री देता येईल का? वीजचोरी कळवणे व आपल्या हक्कांबाबत नागरिक सजग असते तर नागरिकांकडून दररोज हजारो तक्रारी आपल्याकडे आल्या नसत्या का?

नागरिकांमध्ये तक्रारीचा सूर
लाचखोर व ‘वसुली’ जनसेवकांमुळेच वीज वितरण कंपनी तोट्यात आहे. ही प्रकरणे पाहता, यांनीच महावितरणला संपवण्याची सुपारी तर घेतली नाही ना? असा प्रश्‍न मनात उभा राहतो. विनाखंडित वीज मिळणे हा आमचा हक्क आहे, दिवसभर वीज गुल करण्याऐवजी ग्राहक म्हणून आम्हाला विनाखंडित वीज कशी मिळेल यावर लक्ष द्या, असा तक्रारीचा सूर नागरिकांमध्ये आहे.

Exit mobile version