| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील कुंभारआळी येथील कुंभार समाजाने त्यांच्या दीर्घकाळच्या मागणीबाबत शासनाचे लक्ष वेधले आहे. वाढती लोकसंख्या, सांस्कृतिक कार्यक्रमांना वाढती मागणी आणि सामाजिक उपक्रमांचे महत्त्व लक्षात घेता कुंभार समाजाने समाज हॉल उभारण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची अधिकृत मागणी ॲड. प्रवीण कुंभार व समाज प्रतिनिधी यांनी पाली तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
कुंभार समाजामार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, कुंभारआळी परिसरात राहणाऱ्या समाजाची संख्या लक्षणीय आहे. विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव, शैक्षणिक उपक्रम, तसेच समाज विकासाच्या बैठका घेण्यासाठी योग्य, प्रशस्त आणि स्वतंत्र सुविधायुक्त इमारत नसल्याने समाजातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत नगरपंचायत व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून कुंभार समाजाच्या सर्व बांधवांनी ही मागणी कळकळीची असल्याचे सांगितले आहे. समाज हॉल उभारला गेल्यास युवकांच्या उपक्रमांना चालना, महिलांसाठी सामूहिक उपक्रमांची सोय, तसेच स्थानिक विकास प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.
सरकारी जागेअभावी आम्हाला कार्यक्रमांसाठी बाहेर इतर जागा भाड्याने घ्याव्या लागतात. त्यामुळे आर्थिक भारही वाढतो. समाजाच्या प्रगतीसाठी एक स्वतंत्र समाज हॉल अत्यावश्यक आहे.
-सोनाली सोनवणे,
समाज महिला प्रतिनिधी
