| चिरनेर | प्रतिनिधी |
खारपाडा गावातील भगतनगर महामार्ग ते घोटमालवाडीकडे जाणारा पाणंद शेतरस्ता हा पिढ्यानपिढ्यांचा वडिलोपार्जित शेतरस्ता आहे. येथील शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा हा एकमेव शेतरस्ता असून सर्व्हे नंबर 28/3 मध्ये बळीराम पाटील व त्यांच्या तीन भावांचे एकत्रित घर क्रमांक 559/1 ते 4 हे बेकायदा बांधकाम आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची शासनाची पूर्वपरवानगी न घेता बिनशेती न करता पाणंद शेतरस्त्यात नवीन बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हा पाणंद शेतरस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ट्रॉली व नांगर या वाहनांची शेतीच्या मशागतीसाठी आणि उत्पादनाची ने-आण करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आपली भातशेती लागवडीखाली आणता येत नाही.
येथील शेतकऱ्यांनी पाटील भावांविरोधात पेण तहसील कोर्टात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल दि.9 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. मात्र, 2 महिने पूर्ण होऊन देखील संबंधित अतिक्रमणावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. तरी संबंधित पाणंद शेतरस्त्यावरील अतिक्रमणावर ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पेणचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर यांना प्रत्यक्षात भेटून लेखी निवेदन दिले आहे. यावेळी गटविकास अधिकारी यांनी लवकरात लवकर याबाबत योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांचा पाणंद शेतरस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले आहे.







