| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदेच्या नव्याने सुरू असणार्या अद्यावत प्रशासकीय इमारतीचे बांधकामाकरिता 6.50 कोटी रुपयांची निधी अपेक्षित असून, या निधीची मागणी नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे. सध्या या इमारतीच्या कामासाठी 2 कोटींचा निधी खर्च झाला आहे. तर उर्वरित खर्चासाठी आवश्यक निधी लवकरच मिळेल, त्यामुळे येत्या 2023 मध्ये कार्यालय उभे राहील, अशी माहिती उरण नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. नगर परिषदेच्या जुन्या इमारतीच्या अपुर्या जागेमुळे असुविधा होत असल्याने कामगार, नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नवीन या इमारतीच्या आवश्यकता आहे.
50 कोटींहून अधिक वार्षिक बजेट असलेल्या उरण नगरपरिषदेला आठ वर्षांत नियोजित प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे कामगारांना पावसाळ्यात गळक्या छताखाली कामकाज करावे लागत आहे. या रखडलेल्या प्रशासकीय इमारतीची नव्याने निविदा काढून बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
उरण नगरपरिषदच्या मालकीच्या सर्व्हे नं 75 मधील जागेत उभारण्यात येत असलेली अद्यावत प्रशासकीय इमारत 25000 चौरस फुट क्षेत्रात उभारण्यात येत आहे. दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर 20 वाहनांसाठी वाहनतळ, पहिल्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालये, दुसर्या मजल्यावर अद्यावत सभागृह आणि उरण नगरपरिषदला थोडेफार आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी व्यापारी बांधकाम करण्यात येणार आहे.
उरण नगर परिषदेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तो खर्च ही झाला आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामासाठी व कार्यालयातील फर्निचर साठी नगरविकास विभागाकडे 6.50 कोटींच्या निधीची मागणी केली आहे.