जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी निधीची आवश्यकता – पंडित पाटील

| रोहा | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्ते व पूल यांची दुरावस्था झाली आहे. रस्ते व पुलांच्या कामाची मंजुरी दिली जाते. पण परिपूर्ण निधी शासनाकडून मंजूर होत नसल्याने कामे अपूर्ण राहतात. रस्ते व पुलांची कामे दर्जेदार होण्यासाठी शासनाकडून परिपूर्ण निधी मंजूर कामांना देणे आवश्यक असल्याचे मत शेकाप नेते पंडित पाटील यांनी व्यक्त केले आहे.

देशात वेगवान रस्ते विकसीत केले जात असून त्याची गिनिज बुकात नोंद होत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पण पनवेल ते इंदापूर या कोकणात जाणार्‍या एकमेव प्रमुख मार्गाचे दशावतार संपण्याची चिन्हे नाहीत. हा मार्ग 2023 मध्ये पूर्ण करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पण या भागात पडणारा पाऊस, मातीचा प्रकार, रस्त्यालगत झालेली अतिक्रमणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारांची कमतरता अशा विविध कारणांमुळे मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतांश भागाला एमएमआरडीए क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

जिल्ह्यातील मोठमोठे औद्योगिक प्रकल्प तसेच जेएनपीटी व दिघी मांडवा या बंदरांमुळे जिल्ह्यातील रस्त्यांवरील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.रस्ते व पुलांची निर्मिती करत असताना या सर्व बाबींचा विचार केला जात नसल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे,अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

महाड व काशिद येथील पूल दुर्घटनेत काहींचे बळी गेले.त्यानंतर जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आली. पण धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीसाठी कार्यक्रम आखण्यात आला नाही. असे ते म्हणाले.

पंडित पाटील, शेकाप नेते
Exit mobile version