सामाजिक संस्था आणि पोलीसांच्या प्रयत्नांना यश
| नवीन पनवेल | वार्ताहर |
उलवे येथील 19 वर्षीय मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्रीचे संबंध वाढवून ती राजस्थानला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. उलवे येथील संकल्प घरत सामाजिक संस्थेने एनआरआय पोलिसांच्या मदतीने या तरुणीला सुखरूपपणे घरी आणले आणि तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
19 वर्षीय तरुणी उलवे येथे राहत असून एका तरुणाने इन्स्टाग्रामवर तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्या दोघांमध्ये चॅटींग सुरू झाले. त्या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. यातूनच समोरील व्यक्तीने या तरुणीला सहा हजार रुपये पाठवले आणि राजस्थान येथे येण्यास सांगितले. त्या तरुणीने 2 जून रोजी उलवे ते नेरूळ त्यानंतर सीएसएमटी बांद्रा येथुन रेल्वेने थेट राजस्थान गाठले. घडलेला सार्या प्रकाराची माहिती मुलीच्या वडिलांनी एनआरआय पोलीस ठाण्याचे वपोनी सतीश कदम यांना आणि संकल्प घरत सामाजिक संस्थेला देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आपला तपास सुरू केला. तरुणीकडील मोबाईलचे सीडीआर रेकॉर्ड काढण्यात आले. सामाजिक संस्थेचे संकल्प महादेव घरत, आकाश देशमुख, अजय हेगडकर, नरेंद्र देशमुख, प्रकाश मुंढे यांनी किरण स्वार या पोलिसांना घेऊन थेट राजस्थान- उदयपूर गाठले. त्यांनी एका खेडेगावात जाऊन पाहणी केली असता ती मुलगी त्या ठिकाणी सापडली. त्या तरुणीने घडलेला सारा प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने या मुलीला सुखरूपपणे घरी आणण्यात आले. या मदतीमुळे संकल्प घरत सामाजिक संस्थेचे आणि पोलिसांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.