थरार! दोनवेळा पृथ्वी प्रदक्षिणा करणार्‍या फिलीपाईंन्सच्या ‘त्या’ बोटीतून प्रवाशांची सुटका

मुंबई नौदल, जिल्हा पोलीस, अग्निशमन दल, सीआयएसएफ पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन

। अलिबाग । भारत रांजणकर ।
दुबई येथून समुद्रमार्गे भारतात सराव तपासणी करण्यासाठी आलेल्या याच्ट बोटीला रेवस बंदरात आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.13) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेनंतर याच्टमधील पाच परदेशी प्रवाशांना मुंबई नौदल, जिल्हा पोलीस, अग्निशमन दल, सीआयएसएफ पथकाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

प्रवाशांना वाचविण्यासाठी साधारण दीड ते दोन तास हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. याच्टमधील पाचही परदेशी प्रवासी सुखरूप असून त्यांच्याकडून प्रशासनामार्फत माहिती घेतली जात आहे. या जहाजाने यापूर्वी दोन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आहे.करुणा निधन पांडे (भारतीय), बाथी सार (सेनेगल), कारमेन क्लारे लातुंबो सल्वनी, जयरालड फजनोय नाला, मार्कोनी फाब्रो फर्नाडीस (फिलिपाईन्स) यांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

एक भारतीय आणि चार परदेशी नागरिक हे दुबई येथून कोचीन, मलादिव मार्गे मुंबईमध्ये याच्टद्वारे आले होते. हे याच्ट सौर उर्जेवर बनविण्यात आले आहे. याच्टची समुद्रातील तपासणी करण्यासाठी हे पाचजण आले होते. 28 जून रोजी हे याच्ट रेवस बंदरात पोहचले होते. याच्टमध्ये बिघाड झाल्याने ते दीड महिन्यापासून रेवस बंदरात अडकले होते. गुरुवारी (दि.12) मध्यरात्रीच्या सुमारास याच्टमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून पुन्हा पुढील प्रवासाला निघाले होते. मात्र गुरुवारी वातावरण बिघडले.

सोसाट्याच्या वारा सुटल्याने समुद्रही खवळलेला होता. त्यामुळे याच्ट भरकटले. पुढील धोका समजून कप्तानने बंदरातील खडकाच्या बाजूला याच्ट थांबवली. यावेळी सोलर पॅनलच्या बॅटरींना अचानक आग लागली. त्यावेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. प्रसंगावधान राखून याच्ट मधील प्रवाशांनी संबधित अधिकारी यांना मदतीसाठी संपर्क केला.

Exit mobile version