रायगड । प्रतिनिधी ।
धरमतर बंदरातून जयगडकडे रवाना झालेले जेएसडब्ल्यूचे मालवाहू जहाज अलिबाग समुद्रात भरकटले. या भरकटलेल्या जेएसडब्लूच्या मालवाहू जहाजावरील खलाशी सुखरूप असून त्यांना किनाऱ्यावर आणण्याचे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत जहाजावरील सर्व खलाश्यांना किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. समुद्रातील लाटा , सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे बदललेल्या वातावरणात हे मालवाहू जहाज भरकटले. जहाज भरकटले असलेतरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जेएसडब्ल्यूच्या जनसंपर्क विभागाने कळविले आहे.
भरकटलेल्या या मालवाहू जहाजावर 14 खलाशी असून हे खलाशी सुखरूप असलेतरी त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जहाज भरकटले असल्याचे लक्षात येताच जहाजाच्या नाविकाने जहाज अधिक भरकटू नये यासाठी नांगर टाकून जहाज कुलाबा किल्ला परिसरात उभे केले आहे.