युवकांना बचाव कार्याचे प्रशिक्षण

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती उदभवत आहे. नद्यांना महापूर येऊन अनेक गाव पाण्याखाली जातात. अतिवृष्टी व महापुरामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशावेळी दरडग्रस्त व महापुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्यासंदर्भातील प्रशिक्षण जल जिव रक्षक प्रशिक्षण सहकारी संस्था रायगड महाराष्ट्र व ऑस्ट्रॉलीया लाईफ सेविंग एकेडमी यांच्या माध्यमातून नुकतेच 50 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे(बेणसे) व वाईंडर वेल्चर रेस्क्यू एकेडमी कोलाडचे प्रमुख महेश सानप, रामदास कळंबे यांच्या उपस्थितीत कुंडलिका नदीत सर्व प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती, अशा वेगवान प्रवाहाला टक्कर देत यावेळी वास्तववादी बचाव कार्य कसे करावे याचे धडे प्रत्येक्षात देण्यात आले.या बचाव कार्यात लाईफ गार्ड प्रशिक्षण, प्राथमिक उपचार कसे करायचे, बोट हँडलिंग, वाहत्या पुरामधून लोकांना कसे वाचवायचे, दरडग्रस्त भागात नागरिकांना कशी मदत करावी, सर्पदंश झाल्यानंतर प्राथमिक उपचार कोणते करावेत, कृत्रिम श्‍वासोच्छवास देण्याच्या पद्धती याचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दत्ता तरे व महेश सानप यांनी दिली. सदर रेस्क्यू टिमला प्रशासनाकडून पुरेपुर सहकार्य करणार असल्याची ग्वाही प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, डिवा वायएसपी नीलेश तांबे यांनी दिली.

Exit mobile version