गाढी नदीत अडकलेल्या म्हशींना जीवदान

पनवेल पालिकेच्या अग्निशामक विभागाची कामगिरी

| पनवेल | वार्ताहर |

संततधार पडणार्‍या पावसामुळे गाढी नदीच्या प्रवाहात अडकून पडलेल्या 18 म्हशींना पनवेल अग्निशमन दलाने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढून जीवनदान दिले.

दिवसभर पनवेल परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. डोंगरभागातदेखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून, ते पाणी गाढी नदीच्या पात्रात जात आहे. ही गाढी नदी पनवेल शहरालगत वाहत असते. याच नदीचे पात्रात पाण्याची पातळी वाढू लागली. ही पातळी वाढण्याच्या आधी भिंगारी टाटा कॅम्पजवळील नदी पात्रात 18 म्हशी या चरण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी गेल्या होत्या. जसजसे पाणी वाढू लागले या म्हशींना बाहेर येणे मुश्कील होऊन बसले. त्या हंबरडा फोडू लागल्या. हे दृश्य शेजारीच असलेल्या कल्पतरू रिव्हर साईडमधील एका महिलेला दिसले. त्या महिलेने लागलीच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला संपर्क साधला.

त्यावेळी तातडीने कोळखे येथील आग आटोक्यात आणल्यानंतर त्वरित सदर ठिकाणी अग्निशमन दल पोहोचले. त्यांनी प्रथम पाण्यात उतरून म्हशींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते करता आले नाही. त्यानंतर हरीदास सूर्यवंशी (अग्निशमन केंद्र अधिकारी) यांच्या नेतृत्वाखाली संदीप पाटील (उप अग्निशमन अधिकारी), वाहनचालक आकाश दीक्षित, मनीष पगडे, अमर घरत, सागर कोळी यांनी तराफ्याच्या सहाय्याने या 18 म्हशींना नदीच्या किनारी सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Exit mobile version