| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांची आरक्षण सोडत काढण्यात आली. 17 जागांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत प्रभाग दोन मधील तिन्ही जागा या सर्वसाधारण झाल्याने अनेकांच्या निवडणूक लढवण्याच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान तालुक्यातील मुदत संपत आलेल्या 39 ग्रामपंचायत मधील सदस्य पदांचे आरक्षण काढण्यात आले.
मुदत संपलेल्या नेरळ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत मंडळ अधिकारी विश्वास गडदे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. या सोडतीत नेरळ ग्रामपंचायतमधील एकूण 17 जागांपैकी एक जागा अनुसुचित जाती, तीन जागा अनुसुचित जमाती आणि चार जागा नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर एकूण 17 जागांपैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सुरुवातीला जात निहाय आरक्षण काढण्यात आले आणि नंतर महिला आरक्षण काढण्यात आले. महिला आरक्षणाची सोडत चिठ्ठी उचलून काढण्यात आली आणि नऊ वर्षाची काव्या लिये हिच्या हस्ते या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. नेरळ ग्रामपंचायत मधील एकूण लोकसंख्या 18429 असून त्यात 1251 अनुसूचित जातींची तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2881 इतकी आहे. त्या आरक्षण सोडतीत महिला आरक्षण काढण्यात आले त्यात अनुसूचित जातीमधील एक, अनुसूचित जमातीमधील दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील एक अशा पाच आणि सर्वसाधारण मधील नऊ पैकी चार जागा या महिला राखीव ठेवण्यात आल्या.
या आरक्षण सोडतीला रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता मोरे, पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांची उपस्थिती होती. निवडणूक आरक्षण जाहीर करण्यासाठी आलेल्या मंडळ अधिकारी विश्वास गडदे यांना ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी सहकार्य केले. स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती.आरक्षण सोडतीत प्रभाग दोन मधील तिन्ही जागा या सर्वसाधारण झाल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर
