चाकरमान्यांच्या परतीसाठी 880 जादा गाड्यांचे आरक्षण

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गणेशोत्सवासाठी मुंबईतून जिल्ह्यात 1200 जादा एस.टी. गाड्यातून 24,858 मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्यातून 880 जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर (दि.14) मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून दि. 5 सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागातून जादा गाड्या दाखल झाल्या. कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून, त्याचेही पालन केले जात आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनापासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी 1629 गाड्या मुंबईला रवाना केल्या होत्या. सध्या 880 गाड्यांचे आरक्षण झाले असून, गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नियोजन केलेल्या जादा गाड्यांमध्ये मंडणगड आगारातून 73, दापोली 119, खेड 93, चिपळूण 178, गुहागर 124, देवरूख 90, रत्नागिरी 99, लांजा 45, तर राजापूर आगारातून 59 जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. ग्रुप बुकिंगलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Exit mobile version