पंचायत समितींवर महिलाराज
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणानंतर जिल्ह्यातील 15 पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण गुरुवारी (दि.9) जाहीर करण्यात आले. आठ पंचायतींवर महिलाराज असणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रत्येकी एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन आणि सर्वसाधारणमध्ये चार महिला राखीव ठेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाची दोरी महिलांच्या हाती सोपविण्यात आली आहे. चक्री पध्दतीने ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील 15 पंचायतीच्या सभापती पदाचे आरक्षण काढण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही प्रक्रीया राबविण्यात आली. मयुरा महाडीक आणि कायरा शिंदे या दोन मुलींच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके यांनी आरक्षणाचे वाचन केले.
म्हसळा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अनुसूचित जाती (महिला), तळा सभापतीपदासाठी अनुसूचित जमाती, श्रीवर्धनसाठी अनुसूचित जमाती (महिला),कर्जत आणि माणगांव पंचायत समिती सभापतीसाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग, महाड व अलिबाग पंचायत समिती सभापतीपदासाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), खालापूर, उरण, मुरूड आणि पोलादपूरसाठी सर्वसाधारण तसेच पेण, रोहा, सुधागड, आणि पनवेल पंचायत समिती सभापतीपदासाठी सर्वसाधारण (महिला) आरक्षण काढण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी 8 तालुक्यांवर महिलाराज असणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासकिय राजवट सुरु आहे. जिल्ह्यातील पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी यांच्या मार्फत चालविला जात आहे. प्रशासकिय अधिकारी असताना ग्रामीण विकास झाला नसल्याची ओरड नागरिकांची कायमच राहिली आहे. त्यामुळे निवडणूका कधी लागणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपली असून लवकरच पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. प्रशासनामार्फत निवडणुकांच्या हालचाली सुरु झाल्याचे चित्र दिसून आले आहे. अलिबागसह अनेक पंचायत समितीवर महिला आरक्षण लागल्याने काही इच्छुकांची मोठी निराशा झाली आहे. सभापती पदासाठी काही राजकीय कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आपला दबदबा निर्माण केला होता. परंतु महिला आरक्षण लागल्याने त्यांची मोठी हिरमोड झाली असल्याची चर्चा आहे. तसेच महिला आरक्षण लागल्याने काही ठिकाणी आनंदही साजरा करण्यात आला आहे.





