| जालना | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईत धडकणार आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या या आंदोलनाची पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली आहे.
एकीकडे गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईत येणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जरांगे हे मुंबईत येण्यावर ठाम असून त्यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पाडणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. मनोज जरांगे हे जालन्यात बोलत होते. यावेळी त्यांनी 29 ऑगस्टच्या मोर्चाबाबत भाष्य केले. या मोर्चासाठी मराठा बांधवांनी मोठ्या ताकदीने आले पाहिजे. 29 ऑगस्टला सर्वांनी मुंबईला या असे आवाहन आहे. समाजाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तसेच, राजकारण्यांच्या दबावात कोणीही राहू नये. मुंबईत कोणताही राजकारणी येणार नाही. सरकारमधून आम्हाला प्रतिसाद दिला जात नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचे मराठ्यांना बरबाद करण्याचे स्वप्न आहे. मराठ्यांची पोरं आत्महत्या करून मेली पाहिजेत, हे त्यांचं काम आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आम्ही तुम्हाला गुडघ्यावर बसवणार आहोत. येत्या 29 ऑगस्ट रोजी आम्ही आरक्षणाचा तुकडा पाडणार आहोत. मी चार महिन्यांपूर्वीच या आंदोलनाची तारीख जाहीर केली होती. दोन दिवसांपूर्वी आम्ही फोन कॉल केला होता. 20 ऑगस्टच्या आत आमच्या मागण्या पूर्ण करा, असे आम्ही सांगितले होते, असेही यावेळी जरांगे यांनी सांगितले. आम्ही तुमचीच लेकरं आहोत. आम्ही काय चूक केलेली आहे. एखादा माणूस खुनशी असतो. देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी खुन्नस आहे, अशी घणाघाती टीकाही यावेळी जरांगे यांनी केली.






