| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील खारेपाट परिसराला पाणीपुरवठ्यासाठी हेटवणे हे धरण महत्त्वाचा आधार आहे. परंतु, ज्या शहापाडा धरणातून खारेपाटाला पाणीपुरवठा होत आहे, त्या शहापाडा धरणाची सध्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. या धरणामध्ये पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसल्याची स्थिती असून, खारेपाटातील नागरिकांवर पाण्यासाठी परवड होताना दिसत आहे.
हेटवणे धरणातून ताशी सुमारे अडीच लाख लिटर पाणी सोडले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, हे पाणी शहापाडा धरणावरील टाकीपर्यंत पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. परिणामी, खारेपाट भागात अत्यल्प आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे, जे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते ते अशुद्ध आणि प्रक्रियाविना (रॉ मटेरियल) असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागात साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.
पेण तालुक्यात इतके मोठे धरण अस्तित्वात असतानाही खारेपाट भागातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या असल्या तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. सध्या खारेपाट भागात आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जातो, तोही अशुद्ध स्वरूपात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत असली तरी पाणीपुरवठा खाता हतबळ झाल्या असल्याचे पहायला मिळत आहे.







