वृद्धाश्रमातील रहिवासी लसींच्या प्रतीक्षेत

Vaccination healthcare concept. Hands of doctor or nurse in medical gloves with medical syringe ready for injection a shot of Yellow Fever vaccine. close up, selective focus

आधारकार्ड नसल्याने रखडले लसीकरण
। पनवेल । वार्ताहर ।
कोव्हिडवर अद्याप रामबाण औषध सापडले नाही. केंद्र सरकारचे आरोग्य विभाग, टास्क फोर्स, डब्लुएचओ आदींनी सुचविलेल्या औषधोपचाराचा फॉर्मूल्यानुसार कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु आहे. मात्र लसीकरणासाठी सक्तीचे असलेले आधारकार्ड बहुतांशी नागरिकांकडे उपलब्ध नसल्याने विशेषतः अनाथाश्रमातील वृद्धांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात रखडले आहे.
पनवेल तालुक्यात महानगरपालिका तसेच ग्रामीण भागात मोठ्या संख्येने अनाथआश्रम तसेच वृद्धाश्रम आहेत. यापैकी पालिका क्षेत्रातील वृद्धाश्रम व अनाथाश्रममध्ये पालिकेने पुढाकार घेऊन लसीकरण केले आहे. नेरे माथेरान मार्गावर असलेले करुणेश्‍वर वृद्धाश्रम हे यापैकी एक आहे. याठिकाणी सध्याच्या घडीला 35 वृद्ध वास्तव्यास आहेत. यापैकी 10 वृद्धांचे ओळखपत्र उपलब्ध असल्याने या वृद्धांचे लसीकरण जवळील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडले आहे. मात्र जवळ पास 20 ते 25 वृद्धांचे कोणतेच ओळखपत्र यामध्ये आधार अथवा इतर ओळखपत्र उपलब्ध नसल्याने हे वृद्ध लसीकरणापासून वंचित राहिले असल्याचे माहिती करुणेश्‍वर वृद्धाश्रमाचे संचालक संतोष ढोरे यांनी दिली.

वृद्धाश्रमातील विना ओळखपत्र असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहीम आम्ही यशस्वीपणे राबविली आहे. ज्या वृद्धाश्रमातील वृद्धांचे लसीकरण रखडले आहे. अशा वृद्धाश्रम अथवा अनाथाश्रमांनी जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधल्यास जिल्हा आरोग्य विभागामार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण करून अशा नागरिकांचे लसीकरण करता येईल.
-डॉ सुनील नखाते, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल
सध्याच्या घडीला आश्रमात 30 वृद्ध आहेत. यापैकी केवळ 10 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित वृद्धांकडे कोणतेही ओळखपत्र उपलब्ध नसल्याने त्यांचे लसीकरण करण्यास अडसर निर्माण होत आहे.
-संतोष ढोरे, संचालक, करुणेश्‍वर वृद्धाश्रम, नेरे विभाग पनवेल.

Exit mobile version