स्पर्धात्मक निवड चाचणीचा संकल्प

। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारणी कमिटीची पहिली सभा पेण येतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार पडली. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीने पदभार यावेळी स्वीकारला. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रदिप नाईक यांनी नवीन कार्यकारणी सदस्यांचे स्वागत करून पुढील क्रिकेट हंगामात होणार्‍या सर्व वयोगटातील खेळाडूंच्या स्पर्धा, कॅम्पस्, पंच शिबिर, निवड चाचणी बाबत माहिती दिली.

यावेळी अनिरुद्ध पाटील यांनी तयार केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा भाग म्हणून ऑक्टोबर 2024 पासून सर्व वयोगटातील मुला-मुलींच्या संघाची निवड हि स्पर्धात्मक स्वरूपात घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व अकॅडमीच्या संघांना स्पर्धेमध्ये सहभाग देऊन संघ निवडतांना प्रत्येक खेळाडूच्या स्पर्धेतील कामगिरीला महत्त्व दिले जाणार आहे. क्रिकेट क्षेत्रातील तज्ञ लोकांची निवड चाचणीसाठी कमिटीची ह्यासाठी लवकरच तयार करण्यात येणार आहे व त्याची माहीती प्रसार माध्यमांना व संबंधितांना देण्यात येईल. स्पर्धांसाठी जिल्ह्यातील मैदाने उपलब्ध व्हावी यासाठी कमिटी प्रयत्न करणार असून जिल्ह्यातील सर्व अकॅडमी, क्लब संघांना बरोबर घेऊन सर्व कार्यक्रम लवकरच कळविण्यात येईल असे, आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

Exit mobile version