तब्बल 211 धावांनी विंडीजवर विजय
। वडोदरा । वृत्तसंस्था ।
भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडीज महिला संघात रविवारी (दि.22) एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना वडोदरा येथे झाला. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दणक्यात विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात तब्बल 211 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजसमोर 315 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 26.2 षटकात सर्वबाद 103 धावाच करता आल्या आहेत. भारताच्या या विजयात स्मृती मानधना आणि रेणुका सिंग ठाकूरने मोलाचा वाटा उचलला आहे.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 314 धावा केल्या होत्या. भारताकडून स्मृती मानधानाने 102 चेंडूत सर्वोच्च 91 धावांची खेळी केली. तसेच, हर्लिन देओलने 44 धावांची, तर प्रतिका रावलने 40 धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 34 धावांची, तर जेमिमा रोड्रिग्जने 31 धावांची खेळी केली. तसेच, ऋचा घोषने 26 धावा केल्या.वेस्ट इंडीजकडून झायदा जेम्सने सर्वाधिक 5 बळी, हेली मॅथ्युजने 2 बळी, तर डिएंड्रा डॉटीनने 1 बळी घेतला.
वेस्ट इंडिकडून 315 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार हेली मॅथ्युज आणि कियाना जोसेफ यांनी डावाची सुरुवात केली. पण या दोघीही शुन्यावर बाद झाल्या. कियाना पहिल्याच चेंडूवर धावबाद झाली, तर, मॅथ्युजला तिसर्याच षटकात रेणुका ठाकूरने बाद केले. रणूकाने डिएंड्रा डॉटीनलाही 8 धावांवर त्रिफळाचीत केले, कर रक्षदा विल्यम्सला 16 चेंडूत 3 धावांवर तितास साधूने त्रिफळाचीत केले. पाठोपाठ आलियाह एलियेन 13 धावांवर बाद धाली. तर, शेमिन कॅम्पबेल 21 धावांवर बाद झाली. त्यांनाही रेणुकानेच बाद केले. शबिका गजनबी (3) आणि झायदा जेम्सही (9) स्वस्तात बाद झाले. नंतर एफी फ्लेचर आणि करिष्मा रामहाराक यांनी झुंज दिली. परंतु, करिष्माला 11 धावांवर दीप्ती शर्माने बाद केले. त्यानंतरही शमिला कॉनेलला 8 धावांवर प्रिया मिश्राने बाद केले. एफी फ्लेचक 24 धावांवर नाबाद राहिली.
स्मुतीचे सलग चौथे अर्धशतक
या सामन्यात भारताकडून स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी डावाची सुरूवात केली. या दोघींनी एकमेकांना शानदार साथ देताना शतकी भागीदारी केली. त्यांनी 110 धावांची भागीदारी केली. यादरम्यान मानधनाने तिचे अर्धशतक पूर्ण केले होते. तिचे हे एकदिवसीय सामन्यातील 29 वे अर्धशतक असून तिने या वर्षात एकदिवसीय सामन्यांत 650हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, तिचे हे सलग चौथे अर्धशतक आहे. तिने वेस्ट इंडीजविरुद्ध याआधी झालेल्या तिन्ही टी-20 सामन्यातही अर्धशतक केले होते. मानधनाने या सामन्यात 102 चेंडूत 13 चौकारांसह 91 धावा ठोकल्या आहेत.