‌‘रिसोर्स मॅप’मुळे जंगल वाचणार

वनसंवर्धनासाठी सूक्षम नियोजनावर भर , मजरे-जांभुळपाडा रायगड जिल्ह्यातील पहिले गाव

| पाली/गोमाशी | वार्ताहर|

सुधागड तालुक्यातील सामूहिक वन हक्क मान्यता प्राप्त मजरे जांभुळपाडा गावामध्ये स्थानिक सामूहिक वन व्यवस्थापन समितीच्या वतीने जंगलाचे शाश्वत नियोजन करण्याच्या उद्देशाने रिसोर्स मॅप बनवण्यासाठी शनिवारी (ता.16) सायंकाळी गाव सभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व नागरिकांसमोर वन क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन दर्शविणारा रिसोर्स मॅप तयार करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ही पहिली सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती आहे.

मजरे जांभुळपाडा या गावाला 2019 साली सामूहिक वनहक्काचे आधिकार प्राप्त झाले आहेत. या हक्कांतर्गत गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमा बाहेर पारंपरिकरित्या गौण वनउपज गोळा करणे, त्यांचा उपयोग, संग्रह व विक्री करनेसाठी स्वामित्वाचा अधिकार देण्यात आले आहेत. यावेळी वातावरण फाऊंडेशनद्वारे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा, यांनी सामूहिक वन हक्क क्षेत्रात घेण्यात येणारे भविष्यातील नियोजनाचे प्रतिचित्र जमिनीवर रेखाटले. त्यानंतर मजरे जांभूळपाडामधील सर्व ग्रामस्थांनी जमिनीवर संसाधन नकाशा काढला.

सामूहिक वन हक्क क्षेत्रात वृक्षारोपण व इतर कामे, वनतलाव, बंधारे आदींचा समावेश करण्यात आला आहे. यातून पर्यावरणाचा समतोल राखला जाणार असून आदिवासी समुदायचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल, असे मत मत तालुका समन्वयक शिवाजी हिरडे यांनी व्यक्त केले. यावेळी राहुल सावंत, वातावरण फाऊंडेशनच्या भारती पवार, सुभाष जाधव आदी उपस्थित होते. सामूहिक क्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून पर्यावरण राखले जाईल व मोठ्या प्रमाणात होणारे आदिवासी समुदायचे स्थलांतर रोखण्यास याची मदत होणार आहे, असे मत तालुका समन्वयक शिवाजी हिरडे यांनी व्यक्त केले. हा रिसोर्स मॅप तयार करण्यासाठी आदिवासी वाडीतील महिला, पुरुष, मुले व वयोवृद्ध जानकार उपस्थित होते. तसेच हिरडे यांनी तांत्रिक सहाय्य पुरवले.

रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभुळपाडा येथे स्थापन केली आहे. जिल्ह्यातील इतर गावांतही वनसंवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत, जंगले सांभाळण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानेसुद्धा वनक्षेत्रात योगदान द्यावे.

भारती पवार, खजिनदार ग्रामसभा (रोहयो), मजरे-जांभूळपाडा

जंगलांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील सर्वात अमूल्य गोष्ट ही झाडे/ जंगले आहेत. प्रत्येकाने जंगलाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

राहुल सावंत, लिड-प्रोग्राम आणि कँपेन्स, वातावरण फाऊंडेशन

ज्या जंगलांनी आजपर्यंत आम्हाला जगवलं आणि जागवलं त्या जंगलाला आता सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे.

सुभाष जाधव, सचिव, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा
  • रिसोर्स मॅप म्हणजे?
    रिसोर्स मॅप म्हणजे गावाच्या सामूहिक वनहक्क क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन करणे. जंगल टिकवायची असल्यास त्याचे शास्त्रीय नियोजन आवश्यक असते. त्याशिवाय जंगलांचा शाश्वत संवर्धन शक्य नाही. म्हणूनच गावातील सामूहिक वनहक्क क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी गावसभेचे आयोजन करून जंगलाचा रिसोर्स मॅप तयार केला आहे. ज्याद्वारे भविष्यात जंगलांचे कसे नियोजन करणार आहोत, याचे मूर्त स्वरूपातील चित्र ग्रामस्थांसमोर मांडल्याचे मत समितीचे सचिव सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.

  • स्थलांतर रोखण्यासाठी
    गावातील स्थलांतर रोखण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आम्ही गावात राहिल्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळणार आहेत. आम्ही आजपर्यंत जंगले सांभाळली आहेत आणि इथून पुढेही सांभाळणार आहोत, असे मत अनंता वाघमारे, अध्यक्ष, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा यांनी मांडले.
Exit mobile version