| चिरनेर | प्रतिनिधी |
पैशाने तुटली नाती या नाट्य प्रयोगाला पनवेल तालुक्यातील रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण येथील शौर्याच्या जन्मभूमीत क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय क्रांतिवीर महोत्सवात नाटककार हासुराम पाटील लिखित आणि नाटककार धनेश्वर म्हात्रे दिग्दर्शित पैशाने तुटली नाती या नाट्यकलाकृतीचा देखणा प्रयोग मंगळवारी रात्री 23 जानेवारी रोजी शिरढोणच्या क्रांतिवीर रंगभूमीत नाट्य रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला आणि महोत्सवातील हि नाट्य कलाकृती रसिकांसाठी मेजवानीच ठरली. अनेक वर्ष क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने हा सांस्कृतिक क्रांतिवीर महोत्सव भरविण्यात येत आहे. मात्र पहिल्यांदाच यावर्षी या महोत्सवात नाट्य कलाकृतीचा देखावा पहायला मिळाला. मात्र अष्टगंधाच्या कलाकारांनी नाटकात आपल्या अभिनयाचे रंग भरत या संधीचे सोने केले आहे. नाटकात हासुराम पाटील , सुमित कुंभार, वैशाली मोहिते, अशोक म्हात्रे, कृष्णकांत म्हात्रे, रुचिता म्हात्रे , चेतन पाटील , परीशा सरोदे, दिगंबर कोळी, प्रसाद कडू, रोशन घरत, जयकिसन मोकल ,प्रज्योत पाटील आदी कलाकारांनी नाटकातील प्रसंग आणि सादरीकरणातून नाटकाची उंची वाढविली आहे. आनंद कुबल, अशोक पालेकर, कमलाकर सुतार, ध्रुवराज म्हात्रे, अमृत म्हात्रे या तंत्रज्ञांनी संगीत, रंगभूषा, ध्वनी आणि नेपथ्यातून प्रत्येक प्रसंग फुलविला आहे.