। मुंबई। वृत्तसंस्था ।
1 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अद्यावत करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून 1 जानेवारी ते 20 मे पर्यंत 12 लाख 92 हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी 9 लाख 75 हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे 3 लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज 10 हजार तिकीटे काढली जात आहेत.
प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अध़िकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईल (भ्रमणध्वनी) वर MSRTC Bus Reservation अॅपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये 1 जानेवारी, 2024 पासून अमूलाग्र बदल करुन त्या अद्यावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मूलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखिल आगाऊ आरक्षण मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation अॅपच्या वापर प्रवाशांनी करावा असे आव्हान केले आहे.