‌‘आशा की किरण‌’ उपक्रमाला प्रतिसाद

महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे रोटरी क्लबकडून आयोजन; 180 सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग

| महाड | प्रतिनिधी |

रोटरी डिस्ट्रिक्ट व रोटरी क्लब ऑफ महाड यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘आशा की किरण-मातृ व बाल आरोग्यावर संवाद‌’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.19) विरेश्वर हॉल येथे करण्यात आले होते. या उपक्रमात महाड व पोलादपूर तालुक्यातील सुमारे 180 आशा सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

‌‘निरोगी माता, आनंदी बालके-सशक्त उद्याचा भारत‌’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम रोटरी डिस्ट्रिक्टचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, रोटरी क्लब ऑफ महाडने त्याचे यशस्वी आयोजन केले. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा असलेल्या आशा सेविकांना मातृ व बाल आरोग्याविषयी अद्ययावत व शास्त्रीय माहिती देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंके तसेच महाड पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा सावंत, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. सना शेख आणि सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ रोटेरियन डॉ. सुनील शेट आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ महाडचे अध्यक्ष रोटेरियन राजीव वनारसे हे होते.

यावेळी राजीव वनारसे यांनी, रोटरी क्लबच्या विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती देत ‌‘आशा की किरण‌’ प्रकल्पाचा उद्देश आणि त्यामागील संकल्पना स्पष्ट केली. डॉ. सना शेख यांनी, गर्भवती माता व प्रसूतीनंतरच्या मातांच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रसूतीपूर्व काळजी, मातृ आरोग्यातील विविध जोखमीचे घटक, योग्य उपचारपद्धती, सकस व संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, गर्भावस्थेतील आवश्यक काळजी आणि सुरक्षित प्रसूती याबाबत त्यांनी आशा सेविकांना शास्त्रीय माहिती दिली. तसेच, मातृ आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न व समस्यांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुनील शेट यांनी बालकांच्या लसीकरणाचे महत्त्व, लसीकरणाचे वेळापत्रक आणि बाल आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणाची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील अत्यंत प्रभावी व परस्परसंवादी सत्रातून झाले. या कार्यक्रमादरम्यान आशा सेविकांनी त्यांच्या दैनंदिन कार्यात येणाऱ्या विविध अडचणी, माता व बाल आरोग्याशी संबंधित प्रश्न तसेच प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव मांडले. डॉ. सना शेख व डॉ. सुनील शेट यांनी त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंकांचे निरसन केले. त्यामुळे हे सत्र अत्यंत ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि संवादात्मक ठरले.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाला रोटेरियन अरुण गावडे, एजी कोऑर्डिनेटर रोटेरियन राहुल शेट, प्रेसिडेंट-इलेक्ट रोटेरियन नितीन जोशी, रोटेरियन तुषार बुटाला, माजी अध्यक्ष रोटेरियन सुधीर मांडवकर, रोटेरियन सागर सुर्वे, रोटेरियन अभिषेक सुकाळे, रोटेरियन मधुकर मेहता, रोटेरियन रोहन मेहता, रोटेरियन सिद्धेश खोडके तसेच रोटरी क्लबचे अन्य पाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version