निवळी-जयगड रस्ता दुरूस्ती कंपन्यांची जबाबदारी; उदस सामंत यांचे निर्देश

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
दुरवस्था झालेल्या निवळी-जयगड रस्ता दुरूस्तीचा रखडलेला प्रश्‍न मंत्री उदय सामंत यांनी मार्गी लावला आहे. यासंदर्भात नुकताच अधिकारी आणि कंपन्यांची बैठक झाली. या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी कंपन्यांनी झटकू नये, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
42 किमी रस्त्याची जबाबदारी जिंदल आणि चौगुले या दोन्ही कंपन्यांची राहिल. पावसापूर्वी कंपन्यांनी रस्ता सुस्थितीत करावा, असे सूचित केले. याला कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
निवळी -जयगड रस्ता अवजड आणि ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे सतत खराब होतो. या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले होते. गणपतीपुळे पर्यटन स्थळाकडे जाणार्‍या या मार्गावरून पर्यटकांना देखील प्रवास करणे त्रासदायक झाले होते. वाढते अपघात, कंपन्यांच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली दुरावस्था याबाबत स्थानिकांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या.
याची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीने यावर निर्णय घेण्यासाठी मुंबई आज बैठक घेतली. या बैठकीला कोकण विभागिय आयुक्त विलास पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन संजय शर्मा, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, प्रांत अधिकारी विकास सूर्यवंशी, जेएसडब्ल्यू कंपनीचे एस. एम. पाटील, आंग्रे, चौघुले पोर्टचे कॅप्टन गुप्ता उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले, निवळी-जयगड मार्गावरून वाहतूक करणार्‍या कंपन्याच्या अवजड वाहतुकीबाबत संबंधित शासकीय यंत्रणेने सखोल माहिती घ्या. यावर कंपन्यांची असलेली भूमिका काय ती यंत्रणांनी तपासून घ्यावी. रस्ता देखभालीसाठी कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये. कंपन्यांच्या भुमिकेबाबत मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त करून पावसाळ्यापूर्वी हा 42 किमी लांबीचा रस्ता सुस्थितीत करा, असे जिंदल आणि चौगुले कंपन्यांना सांगत रस्त्याची जबाबदारी दोन्ही कंपन्यांची राहील ही भूमिका स्पष्ट केली.
शासनाच्या संबंधित यंत्रणेने देखील या रस्त्याचे महत्व ओळखून आजच्या बैठकीतील या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कंपन्यांकडून तातडीने कार्यवाही करून घेण्याच्या सूचना उदय सामंत यांनी केल्या. या बैठकीला उपस्थित या कंपन्यांचे जबाबदार अधिकारी यांनी या बाबत सकारात्मक भूमिका दाखवली, असून मंत्री उदय सामंत याना लवकरच उपयोजना केली जातील, असा शब्द दिला.

Exit mobile version