दहीहंडीला कोरोनाचे सावट

गोविंदा पथकांचा उत्साह मावळला
पाली/बेणसे | वार्ताहर |
कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसर्‍या वर्षी दहीहंडी व गोपाळकाला साधेपणाने साजरा होत आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असला तरी या संकटावर मात करून पुन्हा नव्या जोमाने दहीहंडी साजरी करूया, असा निर्धार अनेकांनी केला आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी नवसाची हंडी फोडली जाते. वाजत गाजत हाती गदा घेऊन फेरदेखील धरला जातो. महिला व मुलीदेखील यात मोठ्या उत्साहात सहभागी होतात. नोकरी, व्यवसाय व शिक्षण या निमित्त मुंबई, पुणे ठाणे व इतर जिल्ह्यात असलेले तरुण आवर्जून दहीहंडी उत्सवासाठी आपल्या गावी येतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी देखील अनेक तरुणांनी गावी येणे टाळले आहे, असे महाड येथील त्रियुग खेडेकर या तरुणाने सांगितले.
गोकुळाष्टमी म्हणजे फक्त दहीहंडी फोडणे इतक्या मर्यादेचा सण नाही. जिल्ह्यात या सणाला शहर, गाव, आळी व पाखाडी येथे गोपाळकाला साजरा केला जातो. गोकुळाष्टमीच्या अगोदर व दरम्यान ठिकठिकाणी सांस्कृतिक व समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी कुठे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केला जातो. तर कुठे विविध खेळ व स्पर्धा भरविल्या जातात. तर काही ठिकाणी विविध गुणदर्शन कार्यक्रम घेतले जातात. शाळा महाविद्यालयात देखील दहीहंडीची धूम पाहायला मिळते. मात्र सलग 2 वर्षे शाळा महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी या सर्व मौजमस्तीला मुकले आहेत. मोहन जाधव यांनी सांगितले की दहीहंडी सणासाठी तरुण व लहान मुले नियमित सराव करतात. जिल्ह्यातील गोविंदा पथके वर्षभर जय्यत तयारीत असतात. यामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते. ठिकठिकाणी जाऊन दहीहंडी फोडून रोख बक्षिसे देखील मिळवली जायची. या रकमेचा उपयोग विधायक व लोकोपयोगी कामांसाठी केला जात होता. पालीतील श्री स्वामी समर्थ दहीहंडी उत्सवाचे सचिव कपिल पाटील यांनी सांगितले की, यावर्षीदेखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार कार्यक्रम होतील.
संपूर्ण जिल्ह्यात लाखमोलाची दहीहंडी म्हणून राजयोगी मित्रमंडळाची दहीहंडी प्रसिद्ध आहे. शिवसेना नेते प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली या दहीहंडीचे आयोजन 8-10 वर्षे केले जायचे. मात्र, कोरोनाचे संकट असल्याने दहीहंडी रद्द केली आहे. सरकारने दिलेले नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल.
अविनाश शिंदे, अध्यक्ष, राजयोगी मित्रमंडळ, पाली

रायगडात दहीहंडीला अनुमती नाकारली
रायगडात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी न झाल्याने मंगळवारी साजरा होणारा दहीहंडी उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. सार्वजनिक दहीहंडी साजरी करण्यास शासनाने परवानगी दिलेली नसून घरगुती दहीहंडी साजरी करण्यास हरकत नसल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Exit mobile version