पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटले

| पनवेल | वार्ताहर |

पोलीस असल्याचे बतावणी करून एका 68 वर्षीय रिटायर्ड रेल्वे विभागातील कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भारत लक्ष्मण जाधव हे सेक्टर 12 खांदा कॉलनी येथे राहत असून, ते सेक्टर 4 नवीन पनवेल येथे पायी चालत जात असताना या ठिकाणी त्यांना एका व्यक्तीने थांबवले. त्याने तो पोलीस असल्याचे सांगत या ठिकाणी रात्री गांजा सापडला असून, आम्ही ड्युटीला असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांची बॅग चेक केली आणि परत बॅग त्यांच्याकडे दिली. आणि इकडे चोऱ्या होत असून, सोन्याचे दागिने घालू नका ते काढून ठेवा असे सांगितले. त्यांनी गळ्यातील सोन्याची चैन, दोन सोन्याच्या अंगठ्या, पितळेचे अंगठी काढून त्यांच्या खिशात ठेवले. त्यानंतर आणखी एक व्यक्ती त्या ठिकाणी बॅग घेऊन आला. यावेळी पोलीस असलेल्या इसमाने त्याची चौकशी केली आणि सोन्याचे दागिने बॅग मध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानंतर जाधव यांना देखील दागिने बॅगमध्ये ठेवण्यात सांगितले. बॅग मध्ये ठेवत असताना पोलीस असलेल्या व्यक्तीने ते दागिने काढून घेऊन तपासण्याचे नाटक केले आणि पिशवीत दागिने टाकल्याचे नाटक केले. त्यानंतर ते दोघेही मोटरसायकलवर निघून गेले. त्यांना शंका आल्याने त्यांनी बॅगमध्ये पाहिले असता सोन्याची चैन, अंगठ्या दिसल्या नाहीत.

Exit mobile version