पैसे, दागिन्यांच्या हव्यासातून हत्या; लहानशा तिकिटाने सोडवला धागा
| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूण तालुक्यामधील धामणवणे येथील 68 वर्षीय निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या दोन दिवसात यश आले आहे. जयेश भालचंद्र गोंधळेकर (46) याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पैसे आणि दागिन्यांच्या चोरीसाठी त्याने वृद्धेची हत्या केली आहे. न्यायालयाने जयेशला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर जयेशचा साथीदार असलेला संशयित आरोपी गणेश कांबळे पसार असून चिपळूण पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत.
जयेश गोंधळेकर यापूर्वी सातारा येथे काम करत होता. तिथे त्याची गणेश कांबळे याच्याशी ओळख झाली. दोघंही चांगले मित्र असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या दोघांनी मिळूनच वर्षा जोशी यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली.
आरोपी जयेश हा चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातीलच रहिवासी आहे. पैसे आणि दागिन्यांसाठीच त्याने खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या गुन्ह्यात मित्र गणेशही सहभागी असल्याचे खुद्द जयेशने पोलिसांना सांगितले. जयेशला कॉम्प्युटरमधील चांगले ज्ञान असल्याने त्याने हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज डीव्हीडीआर, कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क गायब केली होती. इतकंच नाही, तर जोशींचा मोबाईलही गायब करुन एका पाण्याच्या टाकीत टाकला होता. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवलीच्या पुलावरुन या वस्तू त्याने फेकल्या होत्या. मात्र, त्या शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. जयेश आणि गणेशने खून केल्यानंतर पद्धतशीरपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी जोशींच्या घरात मिळालेले प्रवासाचे जुनं तिकीट आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज यावरुन अवघ्या दोन दिवसात जयेशच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले.
जयेश ट्रॅव्हल एजंट असून त्याच्या माध्यमातून जोशींनी अनेकदा आसाम, पुणे अशा विविध ठिकाणी प्रवास केला होता. त्या हैदराबाद सहलीसाठीही जाणार होत्या. जयेशने त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्याकडे खूप पैसे व दागिने असतील या विचाराने जयेशने एका साथीदाराच्या मदतीने मोठा प्लॅन केला. तोंडात कपड्याचे बोळे घालून, तोंड आणि मान दाबून त्याने जोशींचा खून केला. त्यांचे हात पायही यावेळी बांधण्यात आले होते. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो जोशी यांच्या घराच्या दिशेनेच येत असल्याचे दिसले. जोशींच्या घरात एक जुने प्रवास तिकीट मिळाले होते त्यावर जयेशचं नाव पोलिसांना आढळले. या माहितीवरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.







