रखडलेले मानधन कोणाच्या घशात
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेने नव्याने 721 उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड केली असून, पैकी 691 जणांना विविध शाळांवर नियुक्ती दिली आहे. त्यामुळे आधी मानधनावर घेतलेल्या 169 निवृत्त शिक्षकांना डच्चू दिला आहे. हे करताना संबंधिताना देण्यात आलेले पत्र 29 मे रोजीच तयार होते, मग इतक्या उशिरा हे पत्र का दिले, असादेखील प्रश्न आहे. त्या शिक्षकांचे तीन महिन्यांचे मानधन कोणाच्या घशात गेले, हादेखील संशोधनाचा विषय आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे जरी प्रशासन वागले असले, तरी त्यांच्या रखडलेल्या मानधनाबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. यावर उपाययोजना म्हणून निवृत्त झालेल्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली. यासाठी 169 निवृत्त शिक्षकांची निवड करण्यात आली होती. महिना 20 हजार रुपये मानधन देण्याचे सरकार आणि प्रशासनाने मान्य केले होते.
निवृत्त शिक्षकांना मिळणारी पेन्शनदेखील मानधनाच्या डबल आहे, परंतु प्रशासनाने ते देण्याचे कबूल केल्याने ते वेळेवर देणेदेखील तितकेच गरजेचे आहे, कारण ते मानधन आहे. डिसेंबर 2023, जानेवारी, फेब्रुवारी 2024 या तीन महिन्यांचे मानधन देण्यात आले. त्यासाठीदेखील प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागल्याचे निवृत्त मुख्याध्यापक अजय पाटील यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले. अद्यापही उर्वरित मानधन देणे बाकी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सेवा समाप्तीचे पत्र देताना एवढा उशीर केला. तसेच हे पत्र व्हॉट्सअॅपवर का पाठवले, ज्या निवृत्त शिक्षकांना कमी केले, त्यांची सामूहिक यादी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्ध केली आहे का, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
सेवा रद्द करण्याचे पत्र उशिरा निवृत्त शिक्षकांची तात्पुरती सेवा रद्द करण्यासंबंधीचे पत्र काढले आहे. त्यावर 29 मे 2024 अशी तारीख आहे. पत्र मे महिन्यातच तयार होते, मग ते एवढ्या उशिराने का पाठवण्यात आले. कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्याचा अधिकार हा प्रशासनाचा आहे. तसाच त्यांनी शिक्षकांचे मानधनदेखील वेळेवर देणे गरजेचे आहे. कारण, तरतूद असल्याशिवाय कंत्राटी पदांना मंजुरी मिळत नाही. मग मंजुरी असेल तर निवृत्त शिक्षकांचे मानधन कोणाच्या घशात गेले, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनाचे म्हणणे काय? मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवृत्त शिक्षकांची तात्पुरती सेवा रद्द करण्याचे पत्र काढले आहे. रायगड जिल्ह्याला पवित्र प्रणालीद्वारे 721 शिक्षकांची निवड केली आहे, पैकी 691 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे निवृत्त शिक्षकांची सेवा रद्द करण्यात आल्याचा पत्रात उल्लेख केला आहे.