। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत मंगळवारी (दि.30) बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला दुहेरी संघात खेळणार्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांना सलग तिसर्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा हिने निवृत्ती जाहीर केली.
अश्विनी आणि तनिषाला ‘क’ गटातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सेटियाना मापासा आणि अँजेला यू यांच्याकडून 15-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा हिने निवृत्ती जाहीर केली. हे तिचे शेवटचे ऑलिम्पिक असल्याचे तिने सांगितले.
अश्विनीने 2001 मध्ये तिचे पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले आणि ज्वाला गुट्टासह एक मजबूत आणि इतिहास घडवणारी महिला जोडी तयार केली. तिने 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि उबेर कप (2014 आणि 2016) आणि आशियाई चॅम्पियनशिप (2014) मध्ये कांस्य पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती.अश्विनी आणि ज्वाला या दोन ऑलिम्पिकमध्ये (2012 आणि 2016) एकत्र खेळल्या पण प्राथमिक टप्प्याच्या पुढे त्यांना प्रगती करता आली नाही.






