शेतकरी हवालदिल, पंचनामे करण्याची मागणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अवेळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकर्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून कापणी सुरू झाली आहे. भात तयार झाल्याने त्याची चार दिवसात कापणी आवश्यक आहे. मात्र, या पावसाने पीक आडवे पडले आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भाताला अंकुर येण्याची शक्यता आहे. मागील सहा दिवसांपासून हा पाऊस सायंकाळी पडतो. यामुळे भात कापणीत अडथळे येतात.
जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होवून भातपीक वाया जाते. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात दाणादाण उडवली. गेल्या चार-पाच दिवसांपासून काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे भातपीक काळे पडून कुजण्याची शेतकर्यांनी भीती व्यक्त केली आहे. काही पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वार्यासह पाऊस सुरू आहे. त्याचा फटका कापणीला आलेल्या भात पिकाला बसला आहे. भात पिकांच्या शेतात पाणी भरून राहिल्याने भात पीक काळे पडून कुजण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली असून या वर्षी हातातोंडाशी आलेले चागले भात पीक खराब होऊन मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सहा दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी खात्याने तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावर पिकांना फटका बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात परंपरागत भातशेती केली जाते. अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या, दुसर्या आठवड्यात भात पेरणी करतात. त्यामुळे लावणी जुलै महिन्यात येते व सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कणसे येऊन नोव्हेंबरच्या शेवटी कुठे भात कापणी होते. यंदा जूनमध्ये भात पेरणी केलेल्या शेतकर्यांना जुलैमधील मोठ्या प्रमाणात बरसलेल्या पावसाचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात भातशेती कुजली आणि त्यातून सावरलेली भातशेती चांगली होती. मात्र, जर परतीच्या पावसाचा जर येत्या काळात जोर वाढला तर पुन्हा शेतीवर अस्मानी संकट सावट येईल, अशी भीती असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सरकार आणि प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची मागण होत आहे.
सुमारे 95 हजार हेक्टरवर यंदा भात लागवड करण्यात आली. हजारो हेक्टर क्षेत्र सध्या सर्वाधिक डेंजर झोनमध्ये आहे. हे पिक 20-25 दिवसांपूर्वीच तयार झाले होते. मात्र, पावसामुळे कापता आले नव्हते. परतीच्या पावसाने ते मोठ्या प्रमाणात आडवे झाले आहे. आताच्या घडीला सुमारे 75 ते 80 टक्के भातपिक तयार होण्याच्या अवस्थेत आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असल्याने शेतकर्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आम्ही कृषी विभागातर्फे नुकसान भागाची पाहणी करणार आहोत. तलाठी, ग्रामसेवक ग्रामस्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्त भात पिकांची पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठवला जाईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.