| हमरापूर | प्रतिनिधी |
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला मोठी झळ सोसावी लागत असताना देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे व्यावसायिकदृष्टीने देखील स्वयंपाकासाठी पुन्हा चुलींचा वापर होऊ लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण युद्ध सुरुवात आहे. या युद्धामुळे भारतातील पेट्रोल, डिझेल, गॅस, सोने-चांदी, गोडेतेल व इतर वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची दमछाक झाली आहे. त्यातच गॅस सिलिंडरचा तुटवडा होत असल्याने केंद्र शासनाने तात्काळ व्यावसायिक सिलिंडर देणे बंद केले. तर, घरगुती सिलिंडरना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 25 दिवसांच्या ऑनलाईन बुक करण्याच्या प्रक्रियेनंतरही गॅस सिलेंडर मिळणे कठीण होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेने पेण शहरातील भारत गॅस वरदान एजन्सी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सिलेंडरची होणारी कमतरता पाहता ग्रामीण भागातील आणि व्यावसायिकदृष्ट्या नागरिकांनी चुली सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.






