बळीराजावर परतीच्या पावसाचे संकट

। नेरळ । प्रतिनिधी ।

यावर्षी ऐन बहरात असलेल्या भाताच्या शेतांमधून चांगले पीक मिळण्याची आशा शेतकर्‍यांना होती. मात्र, परतीच्या पावसाने गेली चार दिवस झोडपून काढले आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील भाताच्या शेतीचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या कर्जत तालुक्यात यंदा तब्बल 10 हजारहून अधिक हेक्टर जमिनीवर भाताची शेती फुलली आहे. या भागातील शेतकरी समाधानकारक पावसामुळे आपल्या शेतीची चांगली वाढ झाल्यामुळे सुखावले होते. सर्वत्र पिवळे सोने शेतात बहरलेले दिसत असून यावर्षी बळीराजा खुश होता. परंतु, या वर्षीच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील वारे, कुरुंग, कळंब, पोशिर, वरई आणि आदिवासी भागातील भात शेतीवर या पावसाचा भयावह परिणाम दिसून येत आहे. भाताचे पीक जोमात असतानाच अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतात उभे असलेले पीक वादळी वार्‍याने शेतात आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शासनाने हवामान खात्याच्या माध्यमातून परतीच्या पावसाची घोषणा करायला हवी होती. मात्र, परतीच्या पावसाबद्दल कोणतेही भाकीत हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले नाही. आणि यामुळे भाताचे पीक शेतकर्‍यांनी कापून ठेवल्याने ते पीक शेतात कुजून जाण्याची भीती आहे.

– शशिकांत मोहिते, प्रगत शेतकरी, कर्जत

Exit mobile version