| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पळस्पे मॅरेथॉन नेक्स्ट झोन येथील दहा वर्षीय रेवा रोहिदास दिघे हिने ग्लोबल मॉडेल इंडिया- अल्फा जेन झी 2026 स्पर्धेत ‘जीएमआय लिटील मिस इंडिया ऑफ 2026’ हा मानाचा किताब पटकावला आहे. या यशानंतर बाली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली आहे. पुणे येथील सिम्बायोसिस ऑडिटोरियममध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतासह विविध देशांतील बालकलाकार व मॉडेल्स सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून त्रिशा सोनावणे आणि रेवा दिघे, तर ओडिशातून अनन्या मेहर या तीन बालप्रतिभांची भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. रेवा ही एमएनआर इंटरनॅशनल स्कूल पळस्पेची विद्यार्थिनी असून बालकलाकार आणि मॉडेल म्हणून कार्यरत आहे. तिने यापूर्वी विविध मॉडेलिंग शोमध्ये विजेतेपद मिळवले असून टीव्ही, आणि अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. तिला बेस्ट वर्ल्ड रेकॉर्ड चाइल्ड मॉडेल अवॉर्ड बॉलीवूडमधील महिमा चौधरी यांच्याकडून देण्यात आला आहे. तिच्या या यशामागे शो डायरेक्टर अमर सोनावणे यांचे मार्गदर्शन तसेच आई-वडील रोहिदास सयाजी दिघे आणि तिची आई भाग्यश्री दिघे यांचा मोलाचा पाठिंबा आहे. आता रेवा, त्रिशा आणि अनन्या या तिन्ही बालप्रतिभा बाली येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
रेवा दिघेची आंतरराष्ट्रीय भरारी
