प्रत्यक्ष कामाला मुहूर्त मिळेना
| रायगड | प्रतिनिधी |
कोकणावर झालेली निसर्गाची उधळण पर्यटनाला पोषक ठरली. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सागरी किनारे आणि गड किल्ल्यांमुळे वाढलेले पर्यटन जगप्रसिद्ध झाले. पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होणाऱ्या या जिल्ह्यांमधील पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी रस्ते आणि महामार्गांचे जाळे विणले जात आहे. यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी नऊ हजार कोटींचा आराखडा तयार केला जात आहे. बॅरिस्टर ए.आर. अंतुलेंच्या संकल्पनेतील कोकणाला कॅलिफोर्निया बनविणारा हा महामार्ग पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहे.
रेवस-रेड्डी सागरी महामार्गामध्ये अनेक अडथळे आहेत. परंतु हे अडथळे पार करणे सरकारला सहज शक्य आहे. मुंबईशी जोडणारा धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा पूल मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु बाणकोट बागमांडले पूल नाबार्डकडून आर्थिक सहकार्य मिळूनही दहा वर्षे प्रलंबित आहे. 42 खाड्यांनी व्यापलेल्या कोकणपट्टीतून जाणाऱ्या 498 किमीच्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे मुंबईचे अंतर 80 ते 90 किमीने कमी होऊन प्रवासातील किमान दीड तासाचा वेळ वाचेल. त्यामुळे कोकणातील पर्यटन विकासाला आणखी गती मिळेल. तसेच आंबा उत्पादन व मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे.
सागरी महामार्ग 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर 23 ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. हा महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे. तर मोठ्या पुलांकरिता कालबद्ध नियोजनाची गरज आहे. विशेष म्हणजे गुजरातच्या लखपतपासून कन्याकुमारीपर्यंतच्या चार राज्यांतील सागरी महामार्ग केव्हाच पूर्ण झाला, मात्र रेवस-रेड्डीची रखडपट्टी निधी मिळूनही अजून सुरूच आहे.
रायगड जिल्ह्यातील रेवस सागरी मार्गाची सुरुवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे. 1980 च्या दशकात जलमार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. या मार्गावरील रस्त्याची कामे पूर्णही करण्यात आली होती. मात्र खाड्यांवरील पुलांची कामे रखडली आहेत. रायगड जिल्ह्यातील दिघी-आगरदांडा, बागमांडला-बाणकोट, करंजा-रेवस या प्रमुख पुलांची कामे होऊ शकली नाहीत. तर दाभोळ, केळशी आणि जयगड येथील मोठे पुलांची कामेही बाकी आहेत. काही ठिकाणी पुलांच्या जोडरस्त्याची कामे राहिली आहेत.






